बुधवार, १५ मार्च, २०२३

पाझर

                        पाझर...

                      सूर्य आपली सर्व शक्ती पणाला लावून पृथ्वी तलावर आग ओकत होता. पृथ्वी मातेकडून त्याचा जिव्हारी लागेल असा अपमान झाला होता की काय हे कळायला मार्ग नव्हता. आज आपल्या क्रोधाग्निने पृथ्वी तलावरील सर्व जीव सृष्ट्रीचा नायनाट करून आपल्या अपमानाची परतफेड जणू तो लाल तप्त तारा करू पाहत होता....

                       आज वारा सुध्दा सूर्य देवाच्या मदतीला धाऊन आला होता. सूर्या कडून उष्ण शक्तीचे वरदान मिळवून सर्व पशू पक्षी, वृक्ष वल्ली तील जलांशाचे वाफेत रूपांतर करून तो आपले काम ईमानदार चाकराप्रमाने इमाने इतबारे करत होता.... 

                      या अभद्र युतीमुळे सर्वत्र त्रहीमाम माजला होता.. झाडांची लेकरे रुपी पर्णे कोमेजून सुकली होती. त्यामुळे काही दिवसापूर्वी तकटकीत हिरवीगार दिसणारी झाडे आता विकृत ,कुरूप ,  हाडकुडे भासत होती. आणि मोठ्या आशेने विविध आकाराचे नि रंगाचे किडे, उद्योगी मुंग्या , आपल्या जिभेने त्यांची शिकार करून त्यावर पोट भरणारे सरडे, या झाडावरून त्या झाडावर तुरुतुरु धावणारे मध्येच स्तब्ध होणाऱ्या खारी यासारखे छोटे जीव,  धापा टाकणारी कुत्री,खायला काहीही न मिळाल्यामुळे झाडाची खोडे चाटनारी गुरे यासारखे इतरही जीव  झाडाच्या सावलीत आपली दिनचर्या पूर्ण करू पाहत होती.  निर्जनस्थळी भग्न अवस्थेत असलेल्या मंदिराच्या चिरचींध्या झालेली पताका जशी हवेत फडफडून आपले अस्तित्व टिकविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असते त्याच सारखी अवस्था झाडांच्या फांद्यांच्या अग्रावर असणाऱ्या चार दोन पानांची होती. एखाद्यावेळी  वाऱ्याची जोरदार चपराक आपल्या उरल्या सुराल्या पानांवर पडून आपल्या पासून या पानांना दूर करणार .या विचारांनीच झाडे काळवंडलेली भासत होती. आतापर्यंत टिकाव धरून असलेल्या झडांचीही पाने आपले भान हरपून झाडापासून विलग होऊ लागली होती. आणि वारा त्यांना आपल्या सोबत कुठच्या कुठं घेऊन जात होता. ...

                           जमीनही तापून तापून सूर्या सारखीच उष्णता परावर्तित करू लागली होती. आसपासचा परिसर झलारत होता..

अशा या निष्ठुर वातावरणाला राघोबा चे हिरवीगार जवारीचे पीक सूर्यदेवाला डोळे दाखवत ताट मानेने उभे होते. नेहमी प्रमाणे राघोबा आपल्या शेताकडे आपल्या मुलाला भेटायला..त्याच्याशी हितगुज करायला निघाला होता...

                        चालता चालता तळपायातून वेदनामय कळ उत्पन्न होऊन सर्वांगात पसरून विरून गेली तसा राघोबा भोवळ येऊन हातातील काडीचा आधार घेऊन बाजूलाच असलेल्या निष्पर्ण झाडाच्या वांझोट्या सावलीत विसावला... हातातील काठी बाजूलाच ठेऊन मांड्यांपासून उघड्या असलेल्या पायवाटेच्या धुळीने माखलेल्या आपल्या पायाकडे पाहत होता... आजुबाजुला असलेल्या डोंगरावरून घसरलेल्या भल्या मोठ्या दगडाची बारीक तीक्ष्ण चिरा त्याच्या तळ पायात खोलवर रुतली होती. जखमेतून निघालेले रक्त पायाला असलेल्या धुळीने घट्ट होऊन सुकले होते. त्या जखमेकडे बघून असहायत्तेची एक विलक्षण हास्य लकेर त्याच्या चेहऱ्यावर उठली होती....खूप वेळ तो पायाकडे आणि जखमेला निर्विकार मुद्रेने बघत होता.. भोवळ आल्यामुळे पायातून रुतलेली चिरा काढून टाकावी याचेही भान आणि त्रान त्याच्यात नव्हते. तो अजूनही तिथेच बसून होता.. 

                         सत्तरी ओलांडलेला राघोबा संसाराच्या ओझ्यामुळे कमरेतून वाकला होता. निसर्गाने आणि दैवाने त्याची साथ कधीच दिली नाही. परंतु निसर्गाशी आणि दैवाशी तो आजपर्यंत मोठ्या हिंमतीने लढत होता.

                     निसर्गाची अवकृपा असलेल्या डोंगराळ प्रदेशात त्याचा जन्म ..पावसाचे अत्यल्प प्रमाण ना माणसांची तहान भागवायला पुरेशे होते ना पिकांचे..तरीही येतील कुणबी दगडातून आपली भाकर मिळावीत होता.. याच कठीण परिस्थितीत लहानाचा मोठा झालेला राघोबा ... डोंगरा सारखाच कणखर होता..आपली अख्खी हयात त्याने या डोंगराळ भागातील लाल दगड-मातीच्या शेताला पावसाचे पाणी पाजून धान्य पिकविण्यात घालविली होती..

                     शेतातून मिळणाऱ्या अल्पश्या उत्पन्नात तो आपल्या कुटुंबाचे पोट भरायचा. सदैव दुष्काळ असणाऱ्या या प्रदेशातील ओसाड  जमिनी सारख्या त्याच्या कोरड्या जीवनात प्रेमाचा , मायेचा ओलावा देणारी दोनच माणसे त्याच्या आयुष्यात होती. पार्वती- त्याची बायको आणि सदा - त्याचा मुलगा... 

                      या दोघांनीही खांद्याला खांदा लावून राघोबाची साथ दिली होती.दरवर्षी पडणाऱ्या दुष्काळाचा आणि जीवनात येणाऱ्या संकटांचा सामना राघोबाने मोठ्या हिमतीने नि आनंदाने केला तो पार्वती आणि सदाच्याच साथीने.... 

                      गरिबीच लेण घेऊन जन्मलेला राघोबा कधी कधी मोठ्या खिन्नतेने आपल्या बायकोला म्हणायचा," पार्वते ,तुला आज पस्तोर या गड्याने दोन लुगड्या खेरीज काय बी दिलं नाहीस तरिबी तू कधी राग राग केली नाहीस . दोन येडच्या खाण्याची उपरती असलेला मी.. आनं अश्या गड्यासोबत तू लगीन केलंस ...सुखी संसाराच्या गोड स्वप्नांना दिन रात्रीच्या कष्टांनी फुलुच दिली नाही..

पण कष्टानाही दैवाचा प्रसाद मानून हसत हसत सामोरे जात राहिली..."

                     पार्वती आणि राघोबाच्या जीवनात सदा - त्यांचा मुलगा तोच आनंदाचा जिवंत झरा  होता. सदा ही खूप समजदार होता. त्याला आपल्या परिस्थितीची पूर्ण जाणीव होती. बापाला प्रत्येक कामात मदत करणे त्याचा धर्म होता. मोठ्या हिमतीने त्याने कुटुंबाची धुरा सांभाळली होती. कष्टाचा वारसा लाभलेल्या सदाला शेतीसाठी पाण्याची गरज समजली होती. शेतातील काम करताना तो नेहमीच राघोबाला याविषयी बोलून दाखवत असे. खूप विचाराअंती सदा शेतालाच लागून वाहणाऱ्या नाल्याच्या बाजूलाच एक विहीर खणायाच्या बेतापर्यंत आला होता. राघोबाला हा विचार बोलूनही दाखवला होता...

                      आपले जीवन ,त्यातील कष्ट ही दैवाची मर्जी असे मानणार राघोबा दैवाशी नेहमीच दोन हात करत होता तरीही त्याला विहिरीचा विचार पटत नव्हता. पिकांसाठी पाण्याची गरज तो समजत होता पण या खळकाड डोंगराला पाझार कधीच फुटणार नाही हे सत्यही तो जाणून होता..परंतु मुलाच्या इच्छेखातर त्याने विहीर खणायला सहमती दर्शविली होती..

                       राघोबाच गाव चहूबाजूंनी डोंगरांनी सुरक्षित केलल होत. मायेच्या ममतेने कडेवर घेतलेल्या छोट्या बाळासारखं राघोबाच गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेले ..गावाच्या शेजारून अवखळ अल्लड  खळखळपणे वाहणारा नाला. .. आणि त्याचा सानिध्यात लहरणारी शेते.संपूर्ण गाव हिरव्या रंगानं रंगून जायचं. गावाला निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य फक्त पावसाळ्यातच लाभायच. पावसाळा संपायला येता येता या सोंदर्याचे रंग उडायला लागायचे .. हिरवेपणा वाळलेल्या पानात नाहीसा व्हायचा.. वाहणाऱ्या नाल्यातील पाण्याची जागा  असंख्य लहान मोठे गोलसर पांढुरके दगड घ्यायची ..आणि हळुहळू निसर्गाच्या सौंदर्यानी नटलेल गाव एका ओसाळ माळरानात बदलून जायचं... हाती आलेल्या पिकांसोबत शेतकऱ्यांच्या आशा डोळ्यासमोर मरून जायच्या..

                    पावसाळ्या नंतर येणारा हिवाळा उन्हाळा सारखा तपायचा. आणि उन्हाळ्यात तर सूर्य आग ओकून अख्ख माळरान जाळून टाकायचा... गेल्या कित्येक वर्षांपासून हेच गावाचं नशिबी झालं होतं.

                   आणि अशा दुष्काळी वातावरणात सदा कुदळ, पार , फावडा घेऊन राघोबा सोबत निश्चित केलेल्या जागेवर आला. धोतर आणि फक्त डोक्यावर फटका बांधलेला सदा आत्मविश्वासाने ओतप्रोत वाघासारखा दिसत होता. धरणी मातेला कपाळ लावून त्याने धरणी मातेला पाण्याचा आशीर्वाद डोळे मिटून हात जोळून मनोमन मागितला. आशीर्वादाचा रुपात त्याला पाण्याने भरलेली विहीर आणि तिच्या पाण्यावर तृप्त झालेली हिरवीगार पिके वाऱ्याच्या झोतासंगे गाणी गात असताना दिसली. आणि दिसली आई वडिलांची समाधानाने सुखावलेली मूर्ती. सदाचे डोळे या दृष्यानी पाणीदार चमकले. आणि स्फूर्ती ने त्याची छाती अधिक रुंद झाली. सदाच्या या रूपाकडे पाहून राघोबा च्या मनात आशा पल्लवित झाल्या होत्या. हा गडी काही ना काही करणार असा विश्वास त्याच्या मनात अंकुरत होता.

                     सर्व शक्ती हातात एकवटून सदाने कुदळ डोक्याच्या वर उंचावर नेऊन सर्व शक्तिनिशी जमिनीत खुपसली.. तसा निरभ्र आकाशात वीज कडाळावी तश्या आवाजाने कुदळ आत असलेल्या मोठ्या दगडाला लागून बाहेर उसळली.. आणि दगडाची एक टोकदार शिळा बाजूलाच उभ्या असलेल्या राघोबा च्या पायात वायुवेगाने घुसली.. क्षणात रक्ताचा झरा त्याच्या पायातून धरणीमातेत सामावला..

                   दिवसामागून दिवस जात होती..सदाचा पराक्रम सृष्टीचा प्रत्येक कण अनुभवत होता. त्याच्या कार्याच्या यशस्वीते बद्दल शंका कुशंका ,तर्क वितर्क,अंदाज इत्यादींनी संपूर्ण पंचक्रोशी व्यापली होती.. तस तसा राघोबा च्या जीवाची घालमेल वाढत होती.  तहान भूक विसरून रात्रीचा दिवस करून सदा राघोबा सोबत विहिरीचे काम करत होता. पण विहिरीच्या तळातून पाझर काय साधा पाण्याचा गंधही येत नव्हता..

                 मोठ्या आशेने अन् आत्मविश्वासाने सुरू केलेले काम सदाच्या सहनशीलतेचा अन् ताकदीचा अंत बघत होते. पण सदाही पाणी या एकाच ध्येयाने पुरता वेडा झाला होता... हार पत्करायाला  तयार नव्हता..

                 पार्वती अन् राघोबा दोघेही सदा बद्दल चिंतातुर झाली होती. सदाच्या ढासळत्या तब्बेतीची काळजी दोघांनीही झोपू देत नव्हती . बापाच्या कष्टाला भरघोस पिकाच फळ मिळाव यासाठी पाणी ही एकच कमतरता होती अन् ती दूर करणे .यासाठी जिवाचं मोलही चुकायला तो तयार होता. याची कल्पना दोघांनीही आली होती .म्हणून एके दिवशी सकाळी दोघांनीही सदाला विहिरीचे काम थांबण्याचा सल्ला दिला.. पण ध्येयवेडा झालेला सदा म्हणाला, " आई बाबा तुमची कष्ट मी लहान असता पासून बघत आहो. या कष्टाचं फळ मिळायला हवं तसं कधीच मिळालं नाही..नेहमीच अर्ध्या भाकरीवर आपण समाधान मानलं.. पण आता तसं होणार नाही. मी तुमच्या कष्टाला पाण्याची साथ मिळवून देऊन माझा संकल्प पूर्ण करणार."

                एव्हाना विहीर खूप खोल झाली होती. पण साधा पाझर ही फुटला नव्हता. नाल्याच्या खाली पाणी नक्कीच लपून असेल आणि तिथे विहीर खणली तर खात्रीशीर पाणी मिळेल .या विश्वासाने सदाने विहिरीचे काम सुरू केले होते.. आणि तो आताही या विश्वासावर ठाम होता. 

                 दिवेलागणीला विहिरीचे काम आटोपून सदा घरी आला. घरासमोर असलेल्या लिंबाच्या बुडाशी त्याने कुदळ पार हे ठेवले. आणि अंगावर पाणी घेऊन तो बाजेवर पडला होता. आई भाकरी करत करत त्याच्या सोबत सहज बोलत असताना राघोबा बाहेरून आला. पार्वतीने आपला स्वयंपाक आटोपून दोघांनीही ताट वाढली. आणि स्वतःही शेत शिवाराच्या गोष्टी करत जेवण करून भांडीकुंडी करत बसली. सदा आणि राघोबा बाजेवर पडून विहिरी बाबत चर्चा करू लागले. "सदा, आर लेकरा विहिरी साठी खूप जीव तोडलास तू.. पण राजा धरणी माय काही तुला पाणी देईल असं नाही..जाऊ दे आपलं दैवच मुंगीसारख... जास्त मनावर नको घेऊस... उद्या पासून राहू दे... धरणी मायला एक दिस फुटल पाझर... मिळल पाणी..", निराशेच्या अन् समजुतीच्या ओल्या आवाजात राघोबा म्हणत म्हणत गाढ झोपी गेला.."

                       बापाचे समजुतीचे शब्द एकाताना सदा शांतपणे बाजेवर पडला होता पण ती शांतता वरवरची होती. आतमधून मात्र त्याला खूप गहिवरून येत होते. त्याचा पूर्ण भूतकाळ खडकातून पाझरणाऱ्या पाण्यासारखे त्याच्या मनातून पाझरू लागला. त्यात बापाचे  हळुवार निशब्द प्रेम , बापाचे अविरत कष्ट, बापाची अर्ध्या भाकरीवर भागलेली भूक त्यामुळे कीड लागल्यामुळे वाळत चाललेल्या झाडाच्या खोडासरखी काया , उमेदीचा - आशेचा एकही किरण नसलेले निस्तेज डोळे, आयुष्यभर नाईलाजाने फक्त धोतर घातलेला अर्धनग्न बाप अश्या अनेक आठवणी त्याच्या मनात झिरपू लागला. पाझरणाऱ्या आठवणीच्या पाण्यात आपण गटांगळ्या खाऊन बुडू लागलो असा भास त्याला होऊ लागला...

             विचारमग्न सदाला झोप येत नव्हती. पूर्वेला आकाशात लालिमा पसरायला सुरुवात झाली होती. अंधारलेल्या परिसरातून विविध प्रकारच्या आकृत्या हळुवार साकार होत होत्या. शीतल हवेची चादर पांघरून गाव साखर झोपेत असताना सदा मात्र विचारांच्या, स्वतःच्या अपयशाने त्यामुळे आलेल्या क्रोधाने पेटून उठला अन् हातात कुदळ पार घेऊन विहिरीच्या ठिकाणी पोहोचला.

             उगवतीला लाल रंगाची उधळण करत सूर्य संथपणे वर येत होता . एक नजर सदाने आता पर्यंत केलेल्या पराक्रमावर फिरविली.  विहिरीच्या सभोवताली मातीचा नि दगडांचा मोठा ढीग विहिरच्या खोलीची आणि सदाच्या मेहनतीची साक्ष द्यायला उभे होते. दहा बारा हात रुंदीची विहीर निमुळत्या आकारात चार पाच माणसे खोल होती. विहिरीच्या भिंतीवर कुदळीचे घाव दिसत होते. जागोजागी झाडाच्या मुळ्या विहिरीच्या भिंतीतून असहाय लटकलेल्या दिसत होत्या. सदाने कुदळ पार विहिरीत टाकले आणि झाडाच्या मुळांच्या आधाराने तो खाली उतरला. आतमध्ये ओल्या मातीचा गंध पसरला होता. सदाच्या क्रोधाला ओल्या मातीच्या गंधाने आणखीनच भडकाविले होते. क्रोधाग्निने पेटलेला सदाने आता पाण्याचा आणि आपल्या विश्वासाचा सोक्षमोक्ष लावायच्या इराद्याने कुदळ दोन्ही हातानी घट्ट आवळली आणि सर्व शक्तिनिशी आपला राग कुदळीच्या रुपात धरणी मातेच्या पोटावर काढू लागला. तप्त शरीर, सूर्याचे प्रतिबिंब अंकित झालेले लाल डोळे, रागाच्या आवेशाने स्फुरणाऱ्या नाकपुड्या, लयबध्द तेणे खाली वर होणारी छाती,  शिरा- नसांचे बंधन तोडून शरीराच्या बाहेर येऊ पाहणारे सळसळणारे रक्त असा पाण्याच्या ओढीने पेटलेला सदा एका पाठोपाठ कुदळ पारीचे घाव कितीतरी वेळ मारत होता नि मातीचा ढिगारा आकाशाच्या दिशेने वाढत जात होता. 

                सदाच्या घामाने भिजलेला मातीच्या गंधाने वातावरण भाराले होते... पाण्याच्या खुणा जाणवत होत्या...सदाची अवस्था पाहून धरणी मातेला पाझर फुटत होता... एक भली मोठी शीळा पाण्याचा प्रवाह रोखून असल्याचा भास सदाला झाला . त्या शिळेला बाजूला सारल्यास पाणी मिळेल या विचाराने त्याचे शरीर शहारले. 

               सदाच्या श्वासाची गती मंद होत होती... घसा कोरडा पडला होता... विहीर आपल्या सभोवती फिरत असल्याचा भास होत होता.. डोळ्यात बापाची प्रतिमा अश्रूने पुसट होत होती.. पाण्याच्या ओढीने मन वाहत होते.. पारीचे कुदळीचे प्रहार एका पाठोपाठ एक दगडाला फोडत होते... घावगनिक पाण्याचा पाझर वाढत होता..  सदाचे मन आणखीनच अधिर झाले... आणि शरीरात होते नव्हते सर्व बळ एकवटून त्याने एक कुदळीचा अंतिम प्रहार त्या पाणी रोखून धरणाऱ्या शिळेवर केला... पाण्याच्या दाबाने आणि सदाच्या प्रहाराने शिळेचे असंख्य तुकडे बंदुकीच्या गोळीप्रमाने इतरत्र विखुरल्या...आणि जागृत ज्वालामुखी प्रमाणे मुक्त झालेल्या पाण्याच्या प्रवाहाने सदा आनंदित होऊन खाली कोसळला... विखुरलेल्या दगडाची एक तीक्ष्ण शिळा त्याच्या छातीत घुसली होती... राघोबा चा आनंदित स्पष्ट चेहरा त्याच्या डोळ्यासमोर  आला... स्वच्छ नितळ पाण्याच्या पाझारात सदाच्या रक्ताचा पाझर एकरूप झाला.... सदाचा पराक्रम .... स्वप्न .....पूर्ण झाले..... हळुवारपणे सदाचे डोळे बापाचा आनंदित चेहरा मनात साठवून कायमचे बंद झाले.... कायमचे.....

                         सुखलेल्या डोळ्यातून मोठ्या कष्टाने पाण्याचा थेंब राघोबा च्या धुळीने माखलेल्या पायावर पडला. उष्ण वाऱ्याच्या झोताने त्याच्या डोक्यावरचा फाटका गमचा खाली पडला तसा राघोबा भानावर आला. पायात खोलवर रुतलेली बारीक शिळा काढताना सर्वागात जाणवलेली वेदनेची कळ सदाला भेटण्याच्या ओढीने विरून गेली. शरीरातली उरली सुरली ताकद गोळा करून बाजूलाच पडलेल्या काठीचा थरथरणाऱ्या हातांनी आधार घेऊन उभा होऊन शेताकडे चालू लागला. जवळच असलेल्या शेतापर्यंत मुंगीच्या पावलांनी चालणाऱ्या राघोबाला बराच वेळ लागला. आणि जगासाठी भूतकाळ झालेला सदा राघोबाला सूर्याच्या प्रखर उष्णतेने पेटलेल्या माळरानात  हवेच्या स्पर्शाने लहरणाऱ्या हिरव्यागार ज्वारीच्या रूपाने पिकात दिसला. तप्त उन्हात सावलीच्या रूपाने डोक्यावरून मायेचा हात फिरवणाऱ्या लिंबाच्या झाडात सदा दिसला.. शेतातल्या प्रत्येक कणाकणातून सदचा स्पर्श  जाणवला.. 

                  शेतात फिरता फिरता राघोबा विहिरीकडे आला. तो विहिरीच्या जवळच असलेल्या दगडावर काठीचा आधार घेऊन विहिरीकडे एकटक बघत बसला . पंधरा वीस वर्षापूर्वी विहिरीच्या सभोवती असणारी मातीची उंच ढिगारे नष्ट झाली होती पण सदाच्या घामाचा अन् रक्ताचा पाझर आजही पाण्याच्या रुपात विहिरीत पाझरत होता.....

मोहन मारोती चालुरकर 

गडचांदुर ,ता. कोरपना , जि. चंद्रपूर

9657244895

पाझर..


सोमवार, ६ सप्टेंबर, २०२१

पैसा आणि मानवी जीवन. आज पैसा माणसापेक्षा मोठा झाला आहे का?

 पैसा आणि मानवी जीवन

पैसा आणि मानव

पैसा आणि मानव

          मानवाने आपल्या बुद्धीचा वापर करून पृथ्वीवरील आपले जीवन सहज व सुलभ केले. या मानवाच्या हजारो निर्मिती पैकी एक म्हणजे पैसा.

          आपले दैनंदिन व्यवहार सोपे करण्यासाठी मानवाने पैशाची निर्मिती केली. त्यामुळे त्याला वस्तूंची, सेवेची, एखाद्याच्या श्रमाची, किंमत करणे सोपे झाले. त्यामुळे व्यवहार करणे सहज झाले.

          आज माणसाचे सर्वच व्यवहार हे पैशाच्याच भोवती रेंगाळत असतात. प्रत्येक माणूस हा पैसा कमवणे याच उद्देशातून आपले व्यवहार करतो. कारण पैशाला असलेली किंमत. आज ज्याच्या कडे पैसा आहे तो आपले जीवन सुखी करू शकतो. त्याला समाजात मान-सन्मान मिळतो. या पैशाच्या मदतीने तो मोठमोठी कामे सहज करू शकतो. आज खरंच पैसा ही माणसाची अत्यंत निकडीची वस्तू बनलेली आहे.

          पैशाच्या निर्मितीमागे दैनंदिन व्यवहार सुलभ करणे हा मुख्य हेतू होता. परंतु याच पैशामुळे समाजात आर्थिक विषमता जन्माला आली. समाजातील काही घटक आर्थिक दृष्ट्या सक्षम बनली तर काही घटक दूर झाले आणि आर्थिक विषमतेची खोल दरी निर्माण झाली . श्रीमंत व्यक्ती उत्तोरत्तर श्रीमंत बनत गेला तर गरीब आणखीनच गरीब झाला. त्याला जीवन कसे बसे जगणेही या घडीला कठीण होऊन बसले आहे. त्यामुळेच समाजातील प्रत्येक घटक हा पैशाच्या मागे धावताना दिसतोय. याला आणखी एक कारण म्हणजे सामाजिक दृष्टिकोन.

          आज मानवाच्या विचारसरणीत एक मोठा बदल झालेला दिसतोय श्रीमंत व्यक्तींना समाजात मान सन्मान मिळतो तर गरीब लोकांना समाजात ही नेत्यांची वागणूक दिल्या जाते.

पैसा आणि सामाजिक दृष्टिकोन

          आजच्या वर्तमान सुसंस्कृत समाजात मानवापेक्षा काय मोठे असेल तर तो म्हणजे पैसा. पैसा आहे तर 'कर लो दुनिया मुठ्ठी में ' नाहीतर आप कतार मे है कृपया प्रतीक्षा करे'  ही मानवाची गत . कारण एकच- पैसा . विज्ञान सांगते मानवी देहाची किंमत $10M आहे. पण जिवंतपणी त्याच्याकडे पैसा नसेल तर मात्र काडीची किंमत नसते. खरंच समाजात माणसाची किंमत, लायकी मोजण्याचे एकक बनले आहे पैसा.

          जे उदात्त हेतू ठेवून मानवी समाजाची निर्मिती मानवाकडून झाली त्याच मानवाकडून पैशामुळे समाजातील घटक असलेल्या मानवाची उपेक्षा होत आहे. खरंच हे सत्य आहे का आज मानवापेक्षा पैसा मोठा झाला.?

          हे निर्विवाद खरं आहे की पैशाने आपण सर्व सुखवस्तू घेऊ शकतो .जीवन सुखकर बनवू शकतो. पैशाने आपण जीवन सुखी व सुलभ बनविण्यासाठी भौतिक गोष्टींची पूर्तता करू शकतो .हे खरच आहे.. पैसा असेल तर एखाद्याने ते खुशाल करावं.. पण पैसा आला म्हणजे माणसाने आपली माणुसकी विसरावी हे कितपत योग्य आहे?

          आज आपल्या अवतीभोवती आपल्या दिनचर्येतून वेळ काढून बघण्यास आपल्याला नक्कीच जाणवेल की पैसा हा माणसाच्या डोक्यात शिरला आहे. या पैशाची नशा ही मद्यापेक्षा जास्त प्रभावाने मानवी मनाला उत्तेजित करून समाजातील इतर मानवाला शूद्र नजरेने बघण्यास प्रलोभित करत आहे.

          साधे हॉटेलमध्ये गेल्यास तिथे काम करणार्‍या वेटर ना कुणी दादा ,भाऊ किंवा वेटर म्हणून आवाज देत नाही तर अरे ए, इकडे ये, किंवा तोंड उघडताच ओठांचा चंबू करून शु.. क, शु... क असा आवाज देतात . ते काय नोकर आहेत आपले ? अरे तेही पण मानव आहेत आणि प्रामाणिकपणे आपले काम करत आहे . जसा माणूस म्हणून आपल्याला काही सन्मान आहेत तसेच त्यांनाही मानव म्हणून द्यायला नको का? नाही या सुसंस्कृत समाजात पैशाने मोजमाप केल्या जाते माणसाचे म्हणून त्याला तशी वागणूक....

          रस्त्याच्या कडेला छत्रीच्या सावलीत बसलेल्या चप्पल शिवणारा माणूस, गावातील रस्त्यांची साफसफाई (भल्या सकाळी उठून) करणाऱ्या सफाई कामगार स्त्रिया, घरातील भांडे कपडे धुणार्‍या स्त्रिया भाजी मंडईत जीवाच्या आकांताने ओरडणारे भाजीविक्रेते, घरासमोर अन्नाची याचना करणारे याचक इत्यादी सहजच आपल्याला कमी दर्जाचे वाटतात . हे मानव नाहीत हे समाजातील घटक घटक नाहीत का?

          लाखो करोडो चे घोटाळे करून देश पालन करणारे, गरीब कल्याण योजनेचे पैसे खाणारे अधिकारी, लाखो करोडो भ्रष्टाचार करणारे भ्रष्टाचारी, यांच्यापेक्षा तरी त्यांची लायकी, पात्रता एक माणूस म्हणून नक्कीच मोठी आहे. मग समाजातील एक भाग यांच्याकडे तुच्छतेने का बघत असावा?

          खरंच आज माणसापेक्षा पैसा मोठा झाला आहे का?  माणसाची माणुसकी, दर्जा मोजण्याचे एक परिमाण बनले आहे का???

बुधवार, १८ ऑगस्ट, २०२१

समाधान

 समाधान

Couple sitting near Lake with satisfied life

समाधान (Satisfaction)म्हणजे काय?

                मानवी मनाची अशी अवस्था जिथे व्यक्तीच्या सर्व इच्छा , मोठ्या इच्छा, अपेक्षा पूर्ण झाल्या म्हणजे त्यावर विजय मिळवला अशा अवस्थेत व्यक्ती जेव्हा पोहोचतो तेव्हा व्यक्ती समाधानी होतो . समाधान म्हणजे मानवी जीवनाची परिपूर्णता.

                ज्यांचे जीवन परिपूर्ण तोच व्यक्ती सुखी व समाधानी असतो. प्रत्येक मानवी जीवनाचे व मनाचे  अंतिम ध्येय हे समाधानी सुखी जीवन  असते.


आयुष्यात समाधान का आवश्यक आहे?

                मानवी जीवन व मन विविध भावनांनी युक्त आहे. मानवाच्या जीवनात विविध इच्छा,आकांक्षा, अपेक्षा असतात. या जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत व्यक्ती त्या पूर्ण करण्याकरिता प्रयत्न करत असतो. मुळात मानवी जीवनच आपल्या इच्छा, अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रवास आहे. मानवी जीवनातील एक इच्छा पूर्ण झाली की त्याला समाधान प्राप्त होते. परंतु लगेचच त्याच्या मनात दुसऱ्या इच्छेचा जन्म होतो. आणि तो ती पूर्ण करण्याच्या मागे लागतो. अशाच अनेक इच्छा पूर्ण करण्याचा प्रवास म्हणजेच मानवी जीवन होय. या अशाच अनेक इच्छापूर्ती तून मानवी जीवन समाधानी होते. आणि त्याला जगण्याची नवी उमेद प्राप्त होते.


माणूस खरच परिपूर्ण समाधानी होतो काय?

                मानवी मनाचे आकलन करता असे लक्षात येते की खूपच क्वचित  व्यक्ती असेल ज्या आयुष्यात पूर्णपणे समाधानी आहे. आपल्याला आयुष्यात खूप व्यक्ती मिळतात ज्या म्हणतात कि मी आयुष्यात खूप समाधानी आहे. ईश्वराने मला जे पाहिजे ते सर्व दिले. आता मला आणखी काहीच नको.

                परंतु पूर्ण समाधानाची अवस्था जेव्हा प्राप्त होते, तेव्हा माणसाची जीवन जगण्याची इच्छा नष्ट होते. अशा व्यक्ती जीवन प्रवास पूर्ण करून अनंतात विलीन होतात किंवा तसा प्रयत्न करण्याची मानवी मनाची ओढ होते.

                मानवाने कधीच आयुष्यात पूर्णपणे समाधानी होऊ नये. कारण समाधान मिळवण्यासाठी प्रयत्न करणे हेच व्यक्तीला जीवन जगण्याचे बळ देते.

वाचून समाधान मिळाल्यास नक्की share करा.

गुरुवार, १२ ऑगस्ट, २०२१

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव  

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

           माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय स्वातंत्र्याची 75 वे वर्ष अमृत महोत्सव म्हणून साजरे करण्याचा मानस दिनांक 8 मार्च 2019 रोजी बोलून दाखविला . या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम तसेच विविध संकल्प यावर चर्चा केली व या कार्यक्रमावर विविध सूचनांची मागणी केली.

              भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना प्रत्येक देशवासीयांनी स्वातंत्र्याच्या 75 वर्ष आपण काय मिळविले ?काय गमावले ? आणि समोर आपण काय मिळवायला हवे आणि त्यासाठी कशा प्रकारचे प्रयत्न करायला हवे ? याचा मनोमन विचार करणे आवश्यक आहे.

    देशातील आव्हाने     

     विविधतेत एकता हे भारताचे सर्वात मोठे ठळक वैशिष्ट्य आहे . देशाची विविधता ही भौगोलिक सामाजिक एक आणि आर्थिक बाबतीत प्रकर्षाने जाणवते . देशात अनेक जाती धर्म पंत तसेच आर्थिक स्तरातील लोक राहतात . पण ते सर्व प्रखर राष्ट्रवाद आणि देशाबद्दल असणाऱ्या अतीव प्रेमातून एक संघ आहेत.

शेतकरी आत्महत्या वास्तव

देशातील शिक्षणाचे प्रमाण




स्त्रियांवरील वाढते अत्याचार

अशा या एक संघ देशात विविधतेतून अनेक समस्याही निर्माण झाल्या. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाच्या पदार्पणातही देशात गरीबी ,जातिवाद ,निरक्षरता ,आरोग्याच्या समस्या ,शेतकरी आत्महत्या ,स्त्रियांवरील होणारे अत्याचार या सामाजिक समस्यांमध्ये कुठेच कमतरता आल्याचे दिसून येत नाही. 

  देशात विकासाची गंगा वाहत असतानाही या सामाजिक समस्यांचा अंत आपल्याला करता आला नाही ही खेदाची बाब आहे यासाठी शासन आणि देशवासी म्हणून आपणही तेवढेच जबाबदार आहोत .

भारतीय अर्थव्यवस्था 

  स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर ही भारतीय समाज आणि भारतीय अर्थव्यवस्था ही कृषी आणि कृषी संबंधित व्यवसायावर आधारित होती आणि आहे . एके काळी जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेली भारतीय अर्थव्यवस्था ब्रिटिश राजवटीमुळे रसातळाला गेली . स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय अर्थव्यवस्थेला ( indian economy ) आपल्या पायावर उभी राहताना खूप संकटांना सामोरे जावे लागेल . सन 1991 ला देशाला आपले सोने गहाण ठेवण्यापर्यंत आर्थिक संकटांचा सामना करावा लागला . परंतु तत्कालीन सरकारच्या (जवाहरलाल नेहरू -पंतप्रधान व नरसिंहराव- वित्तमंत्री ) आर्थिक नीतीमुळे भारतीय अर्थव्यवस्था परत जोमाने उभी राहू लागली . उदारीकरण व मुक्त अर्थव्यवस्था यांसारख्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था आता वार्षिक 8% नी वाढत गेली.

               भारतीय अर्थव्यवस्था उत्तरोत्तर वाढतच आहे . सोने गहाण ठेवण्याची नामुष्की ओढवणारी भारतीय अर्थव्यवस्था आज जगात सहावी मोठी अर्थव्यवस्था आहे. अर्थशास्त्र्यानी वर्तविलेल्या अंदाजानुसार भारतीय अर्थव्यवस्था सन 2025 पर्यंत इंग्लंडला मागे टाकून पाचव्या नंबर वर जाणार आणि सन 2030 पर्यंत ती तिसरी मोठी अर्थव्यवस्था होणार . हे वर्तविलेले अंदाज खरे करण्याची मोठी जबाबदारी भारतीय शासन कर्त्यावर आहे आणि ती ते निश्चितपणे पार पडतील यात यत्किंचितही ही शंका नाही.

                चीनची जागतिक भेट असलेल्या करुणा काळातही भारतीय अर्थव्यवस्था डगमगली नाही आणि अशा कठीण काळातही परदेशी गंगाजळीत भारत जगात तिसऱ्या नंबरवर आहे. हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे यशच आहे.

                हा एक विरोधाभासच आहे ही देशाची आर्थिक व्यवस्था सुधारत असताना देशातील जनतेची परिस्थिती मात्र बिकट होत गेली . देशातील जनतेचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यात व कृषी आधारित अर्थव्यवस्थेचा पाया असलेल्या कृषी क्षेत्राला न्याय देण्यात भारतातील शासन करते कमी पडले . स्वातंत्र्याच्या या 75 वर्षाच्या पदार्पणातही अनेक सरकारे आली नि गेली परंतु कोणतेच सरकार या परिस्थितीमध्ये बदल घडवू शकले नाही. 

दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या

            देशात रोजगार निर्मितीच्या फसलेल्या धोरणाचे फलित म्हणजेच वाढती बेरोजगारी व वाढलेली आर्थिक विषमता , हे कोणते सरकार कमी करू शकली नाही . आज देशात 29% म्हणजेच 37 कोटी लोकसंख्या दारिद्र रेषेखालील आपले जीवन व्यतीत करत आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात बेरोजगारी मुळे निर्माण झालेल्या गरिबीचा /दारिद्र्याचा चेहरा अधिकच भयानक आहे.

            स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना शासनकर्त्यांनी बेरोजगारी , गरीबी , दर्जा व अस्तित्व हरवलेली कृषी व्यवस्था , महागाई यासारख्या बाबी वर लक्ष केंद्रित करून राजकारण न करता प्रामाणिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे . तरच देशाला आर्थिक महासत्ता होण्याचे स्वप्न बघण्याचा अधिकार आहे . या बाबी दुर्लक्षित करून आर्थिक महासत्ता होणे हे केवळ स्वप्नवतच राहणार.

विज्ञानातील गरुडझेप

            स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना प्रत्येक देशवासीयांची शेती छाती अभिमानाने फुलणार अशी नेत्रदीपक कामगिरी भारतीय अंतराळ संशोधन व रक्षा या क्षेत्रात भारताने केली.

isro first rocket launch

  जेव्हा भारताचे पहिले रॉकेट प्रक्षेपण सायकल व बैलगाडीच्या मदतीने करावे लागले , तेव्हा जगातील सर्वच विज्ञान व तंत्रज्ञानात अग्रेसर असणारे देश भारता कडे बघून हसत होते परंतु तीच राष्ट्रे भारताच्या पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम यशस्वी करण्याने अचंबित झाली. अशी कामगिरी करणारी इसरो ही अंतराळ संस्था एकमेव ( पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम यशस्वी करणारी ) आहे व तिचा प्रत्येक भारतीयांना अभिमान आहे.

 

 भारताच्या विज्ञान क्षेत्रात मोलाची भर  घालणारे वैज्ञानिक यांचा सर्वांना अभिमान वाटतो.

Great Scientists of India
Kangana With Z plus Security

 स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना देशातील शासकांनी एखाद्या पडद्यावरील नटीला झेड प्लस सुरक्षा देण्या ऐवजी देशाच्या खऱ्या अभिनेत्यांना (वैज्ञानिक / शास्त्रज्ञ) झेड प्लस सुरक्षा द्यावी हीच नम्र विनंती.

Security issue of Scientist

 माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार प्रत्येक भारतीय देशवासी भारत मातेच्या सेवेसाठी आपले प्राणही द्यायला मागे हटणार नाही . परंतु शासनानेही देशातील प्रत्येक नागरिकांचे सामाजिक , आर्थिक , मानसिक समस्यांचे निराकरण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून आपली राजकारणाची दिशा ठरवावी .

सारांश

              स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव प्रसंगी हेच सांगावेसे वाटते की देशातील शासन कर्त्यांचा केवळ शासन करणे हाच हेतू नसावा तर देशसेवा , देशाची प्रगती ही उद्दिष्टे समोर ठेवून त्यांनी मार्गक्रमण करावे आणि भारताला जागतिक महासत्ता , जागतिक गुरु बनवून गतवैभव ,आदर ,मान-सन्मान प्राप्त करून द्यावा .तेव्हाच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव खऱ्या अर्थाने जन उत्सव होणार .....नमस्कार....




Mohan Chalurkar... 

रविवार, ८ ऑगस्ट, २०२१

दिशाहीन मानवी समाज...

           

दिशाहीन मानवी समाज

मानवी समाज व्यवस्था 

मानवी समाजाचा विचार करायचा झाला तर मानवाच्या उत्क्रांती पासून विचार करायला हवा . मानवाची उत्क्रांती लाखो वर्षापूर्वी झाली आणि इतर सर्व सजीवांप्रमाणे सहज प्रवृत्ती म्हणून आपले अस्तित्व टिकवण्याची धडपड निर्माण झाली . आपले अस्तित्व टिकवण्यासाठी त्याला अन्नाची गरज होती तसेच इतर प्राण्यांपासून स्वतःचे रक्षण करायचं होतं आणि हे तो सर्व एकाकी राहून करू शकत नव्हता . आणि याच साठी त्याला समूहाची गरज होती . आणि या गरजेतूनच म्हणजेच आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी तो समूह जीवनात राहू लागला . या एकत्रित राहण्यातून त्याला अन्न , निवारा आणि इतर हिंस्र प्राण्यांपासून संरक्षण मिळू लागले . या समूह जीवनाचा फायदा त्याला समजू लागला. यातूनच उत्तरोत्तर मानवी समाजाची निर्मिती झाली असावी . या समाजातुन समाजातील प्रत्येक घटकाला , सदस्याला सर्व गरजा पूर्ण करता येत होत्या . या समाजात प्रत्येक मानवाला प्रत्येक मानवी घटकाला समान अधिकार , न्याय प्राप्त होत होता . समाजातूनच मानवाच्या शारीरिक , मानसिक व भावनिक गरजा पूर्ण होत होत्या . समाजातील प्रत्येक घटकाला आपले सुखदुःख ,यश -अपयश समाजातील इतरांसोबत वाटता येत होत्या . त्यामुळेच समाजातील प्रत्येक घटक हा समाजाशी एकोप्याने बांधला गेला होता .

          जसजसा काळ पुढे सरकत होता . समाज प्रगती करत गेला . मानवी समाज आधुनिक झाला. इर्षा ही मानवाची सहज प्रवृत्ती आहे. आणि या इर्षेतूनच समाजातील एक गट इतरांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे दाखवण्याची होळ निर्माण झाली आणि समाजातील दुर्बल घटक समाजातच दाबले जाण्यास सुरुवात झाली आणि इथूनच समाजाचे आणि समाजाच्या मूळ हेतुचे विद्रुपीकरण व्हायला सुरुवात झाली .

            मानवा-मानवत ,समाजात इर्षेने मूळ धरले . आपल्या समाजापेक्षा तो स्वतःला मोठे समजू लागला . आर्थिक स्वायत्तेने मानवी समाजात फूट पाडण्याचे काम केले आणि समाजातील मानवी घटक केवळ स्वत:च्या कुटुंबापुरताच मर्यादित झाला आणि मानवाची दृष्टी , बुद्धी अधिकच संकुचित झाली आणि आजचा आधुनिक ?प्रगतिशील ? सुसंस्कृत ? मानवी समाज निर्माण झाला.

           आज आजूबाजूला बघितलं तर मन अधिकच विषण्ण होऊन जाते आणि प्रश्न पडतो हाच का तो समाज ज्या समाजाने मानवाच्या अस्तित्व टिकवण्यासाठी मोलाची भर घातली होती समाजातील प्रत्येक घटकाला प्रेमाने आणि एकोप्याने राहायला शिकवले होते ?

आजच्या भारतीय समाजाचा परिचय

            मानवी समाजाची प्रगती गाव ,उद्योग , मानवी जीवन सुखकर करणारी भौतिक यंत्र यांच्या निर्मितीतून व्यक्त होऊ लागली . पण आज समाजाची वैचारिक , भावनिक आणि सामाजिक जडणघडण काही वेगळ्याच मार्गाने होत आहे . आजच्या समाजाचे स्वरूप म्हणजे आपल्या शेजाऱ्याचे नाव काय ? ते काय करतात ? ते कोण आहे ? हेच आपल्याला माहित नसते. मुळात ती जाणून घ्यायची आपली इच्छाच नसते. एवढी संकुचित विचारसरणी आजच्या मानवाची आणि मानवी समाजाची झाली आहे. स्वरूपावरून विश्व रूपाचे दर्शन घडते यावरूनच मानवी समाज आज कोणत्या पातळीवर येऊन पोहोचला आहे याची जाणीव नक्कीच आपल्या प्रत्येकाच्या मनाला होत असेल?

         

दिशाहीन मानवी समाज

आदी गावांमध्ये एखाद्याच्या घरी काही कठीण प्रसंग आल्यास संपूर्ण गाव त्याला सहकार्यासाठी उभे राहायचे. कोणाच्या घरी एखादा सदस्य वारल्यास संपूर्ण गावावर शोककळा पसरायची आणि आज आपल्या बाजूच्या फ्लॅटमध्ये कोणी मरण पावले तरी त्याची कल्पना आपल्याला त्यांच्या घरातून मृतदेह कुजून दुर्गंधी यायला लागल्यानंतर येते हीच मानवी समाजाची मोठी शोकांतिका बनली आहे . आपले मन आणि आपण इतके एकलकोंडे झालो की आपल्या चार भिंतीच्या बाजूला कोणी सजीव प्राणी आहेत याची पुसटशी कल्पनाही आपल्या मनाला शिवत नाही .

         

दिशाहीन मानवी समाज

दिशाहीन मानवी समाज

आज हजारो जेष्ठ नागरिक घरी दिसत नाही तर वृद्धाश्रमात दिसतात . आज वृद्धाश्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे ते समाजाचे घटक असूनही समाजाने त्यांचा त्याग केलेला दिसतो. समाजाची इतकी अधोगती का झाली ? का होत आहे ? हा प्रश्न निश्चितच चिंतनीय आहे . समाजातील आणखी एक संस्था अनाथालय . अनाथ ज्यांचा कोणीही नाही . एखाद्याचं कोणीही नाही हे कसं शक्य आहे. अनाथ काही सूक्ष्मजीवांची जशी जैविक घटकांच्या एकत्रित येण्याने निर्मिती होते तशी निर्मिती होत नाही. कोणाचे ना कोणाचे भाऊ बहीण किंवा इतर नातेवाईक असतात. पण त्यांना आपलं मानण्यात कोणीही पुढाकार घेत नाही. म्हणूनच ते बिचारे अनाथाचं आयुष्या जगतात.

          आज हजारो बालके , वृद्ध पोटाची खळगी भरण्यासाठी हात पसरताना दिसतात. मानवी समाजाची ही शोकांतिकाच आहे की समाजातील काही व्यक्ती पोटाची चरबी कमी करण्याकरता धावपळ करताना दिसतात तर काही पोटाची खळगी भरण्या करता...

          कोरोणा काळाने तर समाजाचे खरे रूप आपल्यासमोर ठेवले. घरातील सदस्यच घरातील सदस्यांना दूर लोटत होते. त्यांचे मृतदेह स्वीकारायलाही तयार नव्हते . त्यांचे अंतिम संस्कार समाजातील समंजस लोकांना करावे लागले.

          एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ याप्रमाणे मानवी समाजाची दिशा असायला हवी होती . परंतु तो आज दिशाहीन होताना दिसत आहे . भरकटलेल्या मानवी समाजाकडे याच समाजातील काही घटक आशेने बघत आहे. नक्कीच या मानवी समाजाला पुनर्बांधणीची आवश्यकता आहे. 

           या अंधकारमय भविष्य लाभलेल्या समाजातही काही प्रकाशणारे तारे आहेत . जे समाजाला योग्य दिशा दाखवण्याचे उदात्त कार्य करत आहे . आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करून एक नवा , जो मानवी समाजातील प्रत्येक घटकाला योग्य न्याय देणारा ,सर्वांना सोबत घेऊन मार्गक्रमण करणारा मानवी समाज निर्माण करण्याच्या कार्यात सहभागी व्हावे हीच अपेक्षा....


मोहन चालुरकर...


गुरुवार, ५ ऑगस्ट, २०२१

वृक्ष आणि मानवी जीवन

 वृक्ष आणि मानवी जीवन 

Human Life And Nature

वृक्ष आणि मानव यांच्यातील परस्पर संबंध

             पृथ्वीवर जीवनाच्या सुरुवातीपासून वनस्पती - पशुपक्षी गुण्यागोविंदाने राहत आले आहे.आणि एकमेकाबद्दलच्या अतिव प्रेमातून ,  मैत्रीतून ही वसुंधरा स्वर्गाहून सुंदर बनवली .

            सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणवणाऱ्या मानवाने या वसुंधरेचे वर्णन करताना तिला मातेची उपमा दिली आहे.या वसुंधरेचा वर्णन करताना किंवा तिची प्रतिमा अंतर्मनात साठवताना सर्वप्रथम आपल्या मनात येते ती हिरवा शालू परिधान केलेली वृक्ष आणि त्यावर स्वच्छंद मनसोक्त आनंदाने विचरण करणारे पशुपक्षी...

                या पृथ्वीतलावर वृक्ष आणि पशु-पक्षी (मानव ) यांची जोडी म्हणजे एक शरीर तर दुसरा त्या शरीराचा प्राण होय .दोघेही एकमेकांशिवाय आपलं अस्तित्व टिकावू शकणार नाही. 

परंतु मानव आज हे विसरत चालला आहे आणि वृक्षांची अविरत तोड करून तो वृक्षावर नाहीतर स्वतःच्याच पायावर कुराड मारत आहे.

             निसर्ग आपल्या अनेक कृतीमधून मानवाला वृक्ष आणि मानव यांच्या मैत्रीची सहसंबंधाची जाणीव सतत करून देत आहे पण मानव मात्र मदमस्त हत्तींप्रमाणे या संकेताकडे दुर्लक्ष करत आहे....

            या  निसर्गाचं देणं असलेला एक देणेकरी समजून आपल्याला या सहसंबंधाची , वृक्ष आणि मानवाच्या प्रेमाची जाणीव नवीन पिढीला करून द्यावीच लागेल तरच ही वसुंधरा परत आपलं गतवैभव प्राप्त करू शकेल.



mohan chalurkar ...


बुधवार, ४ ऑगस्ट, २०२१

मानवाची प्रगती ...मानवाच्या मुळावर...


 मानवाची प्रगती ...मानवाच्या मुळावर...

Image from internet


              प्रगती ...  प्रगती आपण कशाला म्हणतो प्रगती ती जी मानवी जीवन सुखकर करते पण या मानवी जीवन सुखकर बनवण्याच्या प्रक्रियेत नैसर्गिक घटकांवर पर्यायाने निसर्गावर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता मात्र कटाक्षाने पाळायला हवी.

             आजपर्यंत मानवाने जी प्रगती केली ती वाखाणण्याजोगी आहे पण यातील बहुतेक शोध म्हणा किंवा प्रगती ही अनपेक्षितपणे निसर्गाच्या नैसर्गिक संसाधनाच्या र्हासास कारणीभूत ठरली आहे.

 विसाव्या शतकात नंतर मानवाने भौतिकशास्त्राचे कमालीचे उपयोजन केले आणि जगाला अचंबित करणारी प्रगती केली मानवाची प्रगतीची झेप सरळ सूर्यमालेतील मंगळापर्यंत पोहोचली पण या प्रगतीच्या प्रक्रियेत निसर्गाचे मात्र अतोनात हाल झाली आणि मानवी प्रगती ही मानवा वरच संकट होऊन बूमरँग प्रमाणे परतली.

              प्रगतीच्या या प्रक्रियेत हवा पाणी जमीन तसेच अंतराळ दूषित झाले आणि नैसर्गिक संकटाच्या (ओला दुष्काळ ,कोरडा दुष्काळ , पूरस्थिती, ढगफुटी , भूकंप , वणवा) स्वरूपात वाढ झाली . मानवांच्या याच प्रगतीमुळे हरितवायूंच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आणि जलवायू परिवर्तन होऊन निसर्ग चक्र बदलले याचाच परिणाम म्हणून युरोपमध्ये कधी नव्हे इतका यावर्षी पूर आला, कॅनडाचे सरासरी तापमान 25 डिग्री सेल्सियस ते 30 डिग्री सेल्सिअस पर्यंत राहायचे ते यावर्षी 40 डिग्री सेल्सियस पुढे गेले, चीनमध्ये पावसाने हजार वर्षाचा रेकॉर्ड मोडला, ॲमेझॉन जंगल पृथ्वीची जी फुप्फुसे मानली जाते तिथे खूप मोठा वणवा लागला आणि हजारो मुके प्राणी प्राणास मुकले . खरंच मानवाने जी प्रगती केली ती खरच प्रगती आहे की पृथ्वीचे आणि पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे अस्तित्व धोक्यात आणण्याची प्रक्रिया आहे. यावर विचार करणे ही काळाची गरज आहे.

मानवाच्या प्रगतीमुळे निसर्गाचे झालेलं नुकसान हे कधीही भरून निघणार नाही आहे.

मोहन चालुरकर...

Canada Heat wave

Amezon forest fire

UK's flood




 


वैशिष्ट्यीकृत पोस्ट

दिशाहीन मानवी समाज...

            दिशाहीन मानवी समाज मानवी समाज व्यवस्था  मानवी समाजाचा विचार करायचा झाला तर मानवाच्या उत्क्रांती पासून विचार करायला हवा . मानवाची...