रविवार, ८ ऑगस्ट, २०२१

दिशाहीन मानवी समाज...

           

दिशाहीन मानवी समाज

मानवी समाज व्यवस्था 

मानवी समाजाचा विचार करायचा झाला तर मानवाच्या उत्क्रांती पासून विचार करायला हवा . मानवाची उत्क्रांती लाखो वर्षापूर्वी झाली आणि इतर सर्व सजीवांप्रमाणे सहज प्रवृत्ती म्हणून आपले अस्तित्व टिकवण्याची धडपड निर्माण झाली . आपले अस्तित्व टिकवण्यासाठी त्याला अन्नाची गरज होती तसेच इतर प्राण्यांपासून स्वतःचे रक्षण करायचं होतं आणि हे तो सर्व एकाकी राहून करू शकत नव्हता . आणि याच साठी त्याला समूहाची गरज होती . आणि या गरजेतूनच म्हणजेच आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी तो समूह जीवनात राहू लागला . या एकत्रित राहण्यातून त्याला अन्न , निवारा आणि इतर हिंस्र प्राण्यांपासून संरक्षण मिळू लागले . या समूह जीवनाचा फायदा त्याला समजू लागला. यातूनच उत्तरोत्तर मानवी समाजाची निर्मिती झाली असावी . या समाजातुन समाजातील प्रत्येक घटकाला , सदस्याला सर्व गरजा पूर्ण करता येत होत्या . या समाजात प्रत्येक मानवाला प्रत्येक मानवी घटकाला समान अधिकार , न्याय प्राप्त होत होता . समाजातूनच मानवाच्या शारीरिक , मानसिक व भावनिक गरजा पूर्ण होत होत्या . समाजातील प्रत्येक घटकाला आपले सुखदुःख ,यश -अपयश समाजातील इतरांसोबत वाटता येत होत्या . त्यामुळेच समाजातील प्रत्येक घटक हा समाजाशी एकोप्याने बांधला गेला होता .

          जसजसा काळ पुढे सरकत होता . समाज प्रगती करत गेला . मानवी समाज आधुनिक झाला. इर्षा ही मानवाची सहज प्रवृत्ती आहे. आणि या इर्षेतूनच समाजातील एक गट इतरांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे दाखवण्याची होळ निर्माण झाली आणि समाजातील दुर्बल घटक समाजातच दाबले जाण्यास सुरुवात झाली आणि इथूनच समाजाचे आणि समाजाच्या मूळ हेतुचे विद्रुपीकरण व्हायला सुरुवात झाली .

            मानवा-मानवत ,समाजात इर्षेने मूळ धरले . आपल्या समाजापेक्षा तो स्वतःला मोठे समजू लागला . आर्थिक स्वायत्तेने मानवी समाजात फूट पाडण्याचे काम केले आणि समाजातील मानवी घटक केवळ स्वत:च्या कुटुंबापुरताच मर्यादित झाला आणि मानवाची दृष्टी , बुद्धी अधिकच संकुचित झाली आणि आजचा आधुनिक ?प्रगतिशील ? सुसंस्कृत ? मानवी समाज निर्माण झाला.

           आज आजूबाजूला बघितलं तर मन अधिकच विषण्ण होऊन जाते आणि प्रश्न पडतो हाच का तो समाज ज्या समाजाने मानवाच्या अस्तित्व टिकवण्यासाठी मोलाची भर घातली होती समाजातील प्रत्येक घटकाला प्रेमाने आणि एकोप्याने राहायला शिकवले होते ?

आजच्या भारतीय समाजाचा परिचय

            मानवी समाजाची प्रगती गाव ,उद्योग , मानवी जीवन सुखकर करणारी भौतिक यंत्र यांच्या निर्मितीतून व्यक्त होऊ लागली . पण आज समाजाची वैचारिक , भावनिक आणि सामाजिक जडणघडण काही वेगळ्याच मार्गाने होत आहे . आजच्या समाजाचे स्वरूप म्हणजे आपल्या शेजाऱ्याचे नाव काय ? ते काय करतात ? ते कोण आहे ? हेच आपल्याला माहित नसते. मुळात ती जाणून घ्यायची आपली इच्छाच नसते. एवढी संकुचित विचारसरणी आजच्या मानवाची आणि मानवी समाजाची झाली आहे. स्वरूपावरून विश्व रूपाचे दर्शन घडते यावरूनच मानवी समाज आज कोणत्या पातळीवर येऊन पोहोचला आहे याची जाणीव नक्कीच आपल्या प्रत्येकाच्या मनाला होत असेल?

         

दिशाहीन मानवी समाज

आदी गावांमध्ये एखाद्याच्या घरी काही कठीण प्रसंग आल्यास संपूर्ण गाव त्याला सहकार्यासाठी उभे राहायचे. कोणाच्या घरी एखादा सदस्य वारल्यास संपूर्ण गावावर शोककळा पसरायची आणि आज आपल्या बाजूच्या फ्लॅटमध्ये कोणी मरण पावले तरी त्याची कल्पना आपल्याला त्यांच्या घरातून मृतदेह कुजून दुर्गंधी यायला लागल्यानंतर येते हीच मानवी समाजाची मोठी शोकांतिका बनली आहे . आपले मन आणि आपण इतके एकलकोंडे झालो की आपल्या चार भिंतीच्या बाजूला कोणी सजीव प्राणी आहेत याची पुसटशी कल्पनाही आपल्या मनाला शिवत नाही .

         

दिशाहीन मानवी समाज

दिशाहीन मानवी समाज

आज हजारो जेष्ठ नागरिक घरी दिसत नाही तर वृद्धाश्रमात दिसतात . आज वृद्धाश्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे ते समाजाचे घटक असूनही समाजाने त्यांचा त्याग केलेला दिसतो. समाजाची इतकी अधोगती का झाली ? का होत आहे ? हा प्रश्न निश्चितच चिंतनीय आहे . समाजातील आणखी एक संस्था अनाथालय . अनाथ ज्यांचा कोणीही नाही . एखाद्याचं कोणीही नाही हे कसं शक्य आहे. अनाथ काही सूक्ष्मजीवांची जशी जैविक घटकांच्या एकत्रित येण्याने निर्मिती होते तशी निर्मिती होत नाही. कोणाचे ना कोणाचे भाऊ बहीण किंवा इतर नातेवाईक असतात. पण त्यांना आपलं मानण्यात कोणीही पुढाकार घेत नाही. म्हणूनच ते बिचारे अनाथाचं आयुष्या जगतात.

          आज हजारो बालके , वृद्ध पोटाची खळगी भरण्यासाठी हात पसरताना दिसतात. मानवी समाजाची ही शोकांतिकाच आहे की समाजातील काही व्यक्ती पोटाची चरबी कमी करण्याकरता धावपळ करताना दिसतात तर काही पोटाची खळगी भरण्या करता...

          कोरोणा काळाने तर समाजाचे खरे रूप आपल्यासमोर ठेवले. घरातील सदस्यच घरातील सदस्यांना दूर लोटत होते. त्यांचे मृतदेह स्वीकारायलाही तयार नव्हते . त्यांचे अंतिम संस्कार समाजातील समंजस लोकांना करावे लागले.

          एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ याप्रमाणे मानवी समाजाची दिशा असायला हवी होती . परंतु तो आज दिशाहीन होताना दिसत आहे . भरकटलेल्या मानवी समाजाकडे याच समाजातील काही घटक आशेने बघत आहे. नक्कीच या मानवी समाजाला पुनर्बांधणीची आवश्यकता आहे. 

           या अंधकारमय भविष्य लाभलेल्या समाजातही काही प्रकाशणारे तारे आहेत . जे समाजाला योग्य दिशा दाखवण्याचे उदात्त कार्य करत आहे . आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करून एक नवा , जो मानवी समाजातील प्रत्येक घटकाला योग्य न्याय देणारा ,सर्वांना सोबत घेऊन मार्गक्रमण करणारा मानवी समाज निर्माण करण्याच्या कार्यात सहभागी व्हावे हीच अपेक्षा....


मोहन चालुरकर...


1 टिप्पणी:

Visit again. Follow this blog.

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

दिशाहीन मानवी समाज...

            दिशाहीन मानवी समाज मानवी समाज व्यवस्था  मानवी समाजाचा विचार करायचा झाला तर मानवाच्या उत्क्रांती पासून विचार करायला हवा . मानवाची...