शनिवार, २१ मार्च, २०२६

सांग काय देऊ अन् काय नेऊ?


 

मोडक्या लाकडी खुर्चीवर बसलेला संजय
 

पार्वतीबाईच्या मनात आज विचारांचे वादळ उठले होते. एकच खोली असलेल्या घरात थंड शरीराने घामाघूम होऊन बसलेली. डोळ्यात असणाऱ्या ओलाव्याच्या आरपार शून्यात बघणारी एकटक नजर, अस्ताव्यस्त असलेले, काहीसे अश्रूंनी ओलसर झाल्यामुळे गालांवर चिकटलेले केस, टेबल फॅनच्या हवेच्या झोतांसोबत मुक्त होण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते. सकाळचे चार वाजले असेल कदाचित आतापर्यंत पार्वतीबाईच्या डोळ्यातील पापण्यांनी विसावा घेतला नव्हता. अशीच दिव्याच्या मंद प्रकाशात ती बाजेवर छोट्या संजय शेजारी बसली होती. कुणास ठाऊक असे किती दिवस ती माऊली याच अवतारात होती. संजय पार्वतीबाईचा एकुलता एक मुलगा. खूप वर्षांनी अगणित मंदिरांच्या पायऱ्या झिजवल्यानंतर झालेला संजय अनेक महिन्यापासून चालायला कसलासा  त्रास होत असल्यामुळे त्याचा दिवसातील बहुतेक वेळ अंथरुणातच जात होता. नुकतीच नवव्या वर्गाची सहामाही परीक्षा पास होऊन आनंदाने मनसोक्त खेळणारा बागडणारा संजय पाय दुखू लागल्यामुळे रडत रडत घरी आला. खेळताना काही लागले असेल असे समजून पार्वतीबाईने त्याकडे जास्त लक्ष दिले नाही. परंतु, दिवसागणिक संजयचे लंगडत हळूहळू चालणे अखेर बंद झाले. संजयच्या पायाला कसलीशी गाठ आली होतीआणि ती हळूहळू मोठी होत होती.आता पार्वतीबाई खूप घाबरली होती. आणि तिची संजय सोबत दवाखान्याची वारी नियमित झाली होती. दर तीन दिवसांनी इंजेक्शन आणि पायाला गरम पाण्याचा शेक देणे चालू झाले. चंद्रकलेप्रमाणे संजयच्या मुक्तपणे चालण्याच्या आशा वाढत जायच्या तर कधी कमी होत जायच्या


विचाराच्या अथांग सागरात गटांगळ्या खाणाऱ्या पार्वतीला घराचा दरवाजा उघडाच आहे याचेसुद्धा भान नव्हते. पार्वतीच्या रखरखत्या जीवनात संजय रूपानेच काय तो ओलावा होता. आणि तिचे संपूर्ण जीवन संजयचे जीवन विविध रंगीबेरंगी सुखरूपी पुष्पांनी बहरून टाकण्यासाठी समर्पित होते. त्यासाठी ती सर्वोत्परी दक्ष असायची. लग्नासोबतच तिची सवकण म्हणून आलेली गरिबी तिच्या जिवाभावाच्या मैत्रिणीसारखी आजवर तिच्या सोबत होती. परंतु आजवर ती कधी खचली नव्हती. आज मात्र तिला थकल्यासारखे वाटत होते - शरीराने नि मनाने सुद्धा.

 

अचानक पडलेल्या ग्लासच्या कर्णकर्कश आवाजाने ती भानावर आली. कदाचित उघड्या दारातून एखादे मांजर दुधाच्या लालसेने आले असावे. पार्वती हळूच खिन्नतेने हसलीसंजयला आज परत नेहमीप्रमाणे दवाखान्यात न्यायचे होते. म्हणून ती लगबगीने कामाला लागली होती. हातात केरसुणी घेऊन तिच्या आयुष्यासारखी अस्ताव्यस्त असलेली खोली साफ करू लागली.तिच्या  अशांत मनात मात्र भीतीचे काहूर माजले होते.तीन दिवसापूर्वी दवाखान्यात संजयच्या पायातील गाठीचा एक्सरे इतर तपासण्या डॉक्टरांनी केल्या होत्या.आणि आज त्यांचे रिपोर्ट मिळणार होते.



        पार्वतीचे
सर्वांग भीतीने थरथरत होते. डोळ्यांत अश्रूंचा महापूर दाटला होता, पण तिच्या घशाला पडलेली कोरड शांत करण्याची ताकद त्या खऱ्याखुऱ्या पाण्यातही नव्हती. संजयच्या विचाराने वारंवार कंठ दाटून येत होता. केरसुणीच्या फरशीवरील प्रत्येक झोतागत तिला डोळांसमोर फरशीवर खेळणारा बागडणारा संजयचे चित्र दिसत होते. नि केरसुणीच्या पुढच्याच झोताने ते चित्र विद्रूप व्हायचेतसा तिचा जीव अधिकच कासावीस व्हायचा

 

उघड्या असलेल्या दरवाज्यातून आलेल्या दृष्ट हवेच्या झोताने पार्वती भानावर आली. संजयच्या काळजीने काळवंडलेल्या अंतर्मनात तेवत असलेल्या आशारुपी दिव्याच्या प्रकाशाच्या ऊर्जेने सर्व बळ एकवटून तिने स्वतःला सावरले. असे निराश होऊन चालणार नाही असे स्वतःच्याच मनाला दटावले. स्वतःची सर्व तयारी करून तिने संजयला आवाज दिला, अरे बाळा, ऊठ आता. बघ सूर्य किती वर आला आहे. आज आपल्याला दवाखान्यात जायचे आहे.“ आईचा आवाज ऐकून आळस देऊन संजय उठू लागला. अंथरुणातून उठताना संजयला होणारा त्रास बघून पार्वतीचे मन पाणी पाणी होत होते. संजयनेही कसेबसे करून सकाळची दिनचर्या पूर्ण करून दवाखान्यात जायची तयारी केली. आणि आईची वाट बघत तो घराबाहेर अंगणात एकावर एक ठेवलेल्या तीन विटांच्या आधाराने दिमाखात उभ्या असलेल्या तीन पायाच्या लाकडी खुर्चीवर सकाळचे ऊन खात बसला होता. सकाळचे कोवळे ऊन संजयला खूप आवडत होते. पायाला थोडी ऊब मिळायची. आणि पायाला, बरोबर गुडघ्याच्या मागील भागात, आलेल्या गाठीमुळे आलेली अकडण थोडी कमी व्हायची. म्हणून नित्यनेमाने संजय सकाळी बाहेर त्याच मोडक्या खुर्चीवर बसलेला असायचा. इतक्यात पार्वतीने घराबाहेर येऊन आपल्या खांद्यावर अडकवलेली दवाखान्यातील भरगच्च कागदांनी भरलेली कापडी पिशवी सांभाळत दरवाज्याला कुलूप लावून घेतले. आणि आपली दृष्टी संजयकडे वळवली. का कुणास ठाऊक पण त्या मोडक्या लाकडी खुर्चीवर संजयने बसणे तिला आवडत नव्हते. कदाचित तिला भीती वाटत असेल की संजयचीही अवस्था त्या मोडक्या लाकडी खुर्ची सारखी झाली तर. ती मोडकी खुर्ची जणू तिच्या मोडक्या आशेचेच प्रतिबिंब होते

 

दवाखान्यात जायला उशीर होऊ नये म्हणून ती थोडी लवकरच घरून निघाली होती.अरुंद गल्ल्यांच्या दुतर्फा दाटीवाटीने एकमेकांना खेटून असलेली पंधरा - वीस घरे पार केली, की जवळच रिक्षा स्टँड होते. बायबापाड्यांची सकाळची कामे चालू होती. दोघा मायलेकांना जातांना पाहून संजयच्या पायाची सर्वजण चौकशी करत होते. पार्वतीचा लाघवी आणि सर्वांच्या मदतीला धावून जाण्याच्या वृत्तीमुळे तिनं सर्वांच्या मनात एक विशिष्ट स्थान निर्माण केलं होतं. त्यामुळेच तिच्यावर कोसळलेल्या संकटामुळे आजुबाजूची माणसे तिच्या परिस्थितीकडे दयेने पाहत होती. स्वतःवर कोसळलेल्या अनपेक्षित परिस्थितीमुळे पार्वतीचा जीव आधीच रडकुंडीला आला होता. या सर्व बाया आस्थेने विचारपूस करत आहे हे जाणून सुद्धा त्यांच्याशी बोलण्यात तिला काहीच रस नव्हता. म्हणूनच चौकशी करणाऱ्या बायांना थांबून केवळ ' हो ', नाही ' या तुटक्या शब्दांतच, तर कधी मान हलवूनच चेहऱ्यावर उसने केविलवाणे स्मित आणून प्रतिसाद देत होती. यासर्वामध्येही तिचे लक्ष मागून हळूहळू लंगडत येणाऱ्या संजय कडे असायचे. त्याला चालताना होणाऱ्या त्रासाने तिचा जीव अधिकच तुटायचा. संजय जवळ आला की ती परत चालायला सुरुवात करायची. बायांच्या सकाळच्या कर्मकांडामुळे गल्लीमध्ये कुठेकुठे पाणी साचले होते. त्यामुळे गल्ली काही ठिकाणी घसरी झाली होती. त्या चिंचोळ्या गल्लीतून छोटीछोटी मुले खेळताना इकडून तिकडे धावायची. त्याच गल्लीतून एकमेकांना खेटून गाड्या कर्णकर्षक हॉर्न वाजत दोन बोटांच्या अंतरावरून पाणी अंगावर उडवत निघून जायचे. सर्व मानवी अमानवी अडथळ्यांना चुकवत पार्वती मागून येणाऱ्या संजय वर ओझरता दृष्टीक्षेप टाकत पुढे पुढे निघाली होती. जवळच असणारा रिक्षा स्टँड आज आल्या येत नव्हता. म्हणून पार्वती आपल्या नशिबाचा राग संजयवर, "अरे, चाल लवकर. किती वेळ लावतोस बाळा? असे त्याच्याकडे बघताच रागावत पुढे पुढे निघाली होती.


     संजयचा अपघात

"अगं, पार्वती. अगं , थांब ना", लांबून येणाऱ्या आवाजाने पार्वती तर पार वैतागूनच गेली. आधीच होत असलेला उशीर आणि त्यात या वांझोट्या चौकश्यांनी तिचा जीव जेरीस आला होता. नाईलाजाने पार्वती मान मागे करून बघते बघते तोच एक गाडी कच्चकन ब्रेक मारत घसरत संजयकडे येत होती. अनपेक्षितपणे अंगावर येणाऱ्या गाडीच्या आवाजाने संजय आजुबाजूला असलेल्या लोकांचा एकच गोंधळ आणि गलका उडाला. आणि ते दृश्य बघून पार्वतीच्या जीव गळ्यापर्यंत आला. हे अनपेक्षित दृश्य बघून भीतीची एक शिरशिरी पार्वतीच्या सर्वांगातून निघून गेली. शरीर थंड पडून पाय हत्तीच्या पायासारखे जागेवरच रुतून स्थिर झाल्यासारखे वाटत होते. तिच्या कंठातून शब्द फुटत नव्हते. डोके गरगरायला लागले. आजुबाजूची घरे फिरल्यागत भासायला लागली. आणि आता पार्वतीचा तोल जाऊन पडणार इतक्यातच तिला कुणीतरी आपल्या घट्ट हाताने सांभाळत असल्याचे जाणवले. त्या स्पर्शात आपलेपणाची ऊब पार्वतीला जाणवली. अचेतन अवस्थेत पार्वतीने सांभाळणाऱ्या त्या व्यक्तीकडे बघितले. तो चेहरा चिरपरिचित वाटला. पार्वती आणि तिची नजरानजर झाली. काळ क्षणभर थांबल्याचा आभास तिला झाला. या क्षणाला काय करावे? काय बोलावे? तिला काहीएक सुचत नसल्याने गळ्यात शब्द दाटून तिचा गळा भरून आला. आतापर्यंत कुणासमोरही मदतीची याचना करणाऱ्या पार्वतीच्या डोळ्यात स्पष्टपणे मदतीची याचना जाणवत होती. हे तिलाही जाणवत होते. म्हणूनच पार्वतीने आतापर्यंत मनात साठवलेल्या दुःखाला थरथरणाऱ्या ओठातून काहीही बोलता अश्रुंच्या रूपात मार्ग मोकळा करून दिला...  रडता रडता तिचे भान कधी हरवले हे तिला समजलेच नाही. तिची शुद्धी हरवण्यापूर्वी तिच्या श्वासातून स्पष्टपणे ' लक्ष्मी ' या नावाचा उल्लेख झाल्याचे जाणवले.

 

पार्वतीचे स्वप्न

स्वच्छ सोनेरी प्रकाशाचे धुकं धरणीमातेच्या सर्वांगावर पसरलेलं होतं. धरणीमातेच्या कुशीतून नुकत्याच बाहेर आलेल्या बोटभर कोवळ्या हिरवळीन आळस बाहेर काढण्यासाठी आपली कोवळी हात मुक्त आसमंतात पसरली होती. कोवळ्या मखमली पानांनी सर्व वृक्षवल्ली, पिके आनंदाने खोडकर वाऱ्यासोबत बेभान होऊन आनंदाने मनसोक्त खेळत होती. या छोट्या बालगोपाल हिरवळींचे खेळ बघत एक वयस्क वृक्ष भक्कम खोडासह खोलवर जमिनीत पाय पसरून आकाशाशी स्पर्धा करत उभा होता. त्याने आपली फांद्यारूपी हात जणुकाही नवीन उगवणाऱ्या हिरवळीला आशीर्वाद देण्यासाठी चहुदिशेला लांबच लांब पसरली होती. अशा प्रसन्न वातावरणात पार्वती संजय सोबत आनंदाने बसली होती. मोहक वातावरणातील प्रसन्नता संजयच्या चेहऱ्यावर बघून पार्वतीला अतीव आनंद होत होता. जणुकाही आपण संजयच्या रूपाने स्वर्गसुख प्राप्त केल्याचा भास तिला होत होता. खोडकर वाहणारा वारा सूर्याच्या उष्णतेने आता जरा वेगानेच वाहू लागला होता. वृक्षाच्या हजारो पानातून वाहणारा वारा त्या पानांना दृष्टपणे तोडून झाडापासून तोडून विलग करू पाहत होता. पुष्कळशी पाने त्या वाऱ्यासोबत गटांगळ्या खाऊ लागली होती. वारा हळहळू वादळाचे रूप घेत होता. वृक्षाला आपल्या लांबच लांब पसरलेल्या फांद्या अन् पार्वतीला आपल्या साडीचा पदर लांबच लांब केसांचा झुपका सांभाळण्यासाठी धडपडत होत्या. प्रसन्नता आता भीतीमध्ये रूपांतरित होत होती. वृक्षाच्या फांद्या पिसाळलेल्या वाऱ्यामुळे एकमेकावर आढळत होती. त्यांच्यातून कळ कळ असा ध्वनी येऊ लागला. संजयच्याही चेहऱ्यावर भीतीचे सावट दिसू लागले होते. दोघेही एकमेकांना घट्ट पकडून झाडाच्या आधाराने उभे राहण्याचा केविलवाणा प्रयत्न करू पाहत होते. परंतु अचानक एका फांदी झाडाची सोबत सोडून त्या मायलेकांच्या दिशेने झेपावली. स्वतःकडे झेपावणाऱ्या फांदीकडे पार्वतीची दृष्टी गेली. काळ स्तब्ध झाला. पार्वतीने संजयला सर्व शक्तिनिशी उराशी घट्ट पकडले. इतक्या वादळातही ती घामाने भिजून गेलेल्या पार्वतीच्या घशातील स्वरतंतू कोरड पडून चिकटल्या गेले होते. जीवाच्या भीतीमुळे तिच्या तोंडून प्रयत्न करूनही आवाज निघत नव्हता. नियती आज आपल्याला संपवणार असल्याची पूर्ण जाणीव तिला झाली. तिचे संपूर्ण शरीर निर्जीव पुतळ्यागत स्थिर झाल्याचे तिला भासले. हाच आपला अंतिम क्षण समजून ती नियतीला शरण गेली आणि तिने डोळे मिटले

     

पण ती एक आई होती. आपल्या लाडक्या संजयची माय होती. तिचे हृदय परत संजय साठी धडधडू लागले. माझ्याशिवाय एकट्या घाबरलेल्या संजयचे काय झाले असेल या जाणिवेने सर्व शक्तीने तिने आपले डोळे उघडले. आणि बघते तर कायसर्वत्र पसरलेल्या अंधारात वरून उंचावरून सरळ तिच्या डोळ्यांकडे एक प्रकाशाचा कवडसा झेपावत होता. आजूबाजूला पसरलेल्या अंधाराला दूर सारण्याचा प्रयत्न करत होता. भेदरलेल्या अवस्थेत ती अधिकच कावरीबावरी झाली होती. अश्या गोंधडलेल्या चित्ताने तिने आपली नजर चोफेर फिरवलीती स्वताच्याच घरी बाजेवर निपचित पडलेली होतीतिचेच घर असूनही काहीतरी वेगळेपणा तिला जाणवत होता. तिचे डोके गरगरायला लागले. तिची दृष्टी घरच्या छताला लागलेल्या भिंतीला अडकवलेल्या संजयच्या फोटोकडे गेली. आणि पार्वती काळ्याकुट्ट ढगांनी भरलेल्या आसमंतात जशी लख्ख वीज चमकून संपूर्ण विश्व उजळून निघावे तशी ती भानावर आली. अन् तिचा रोमरोम संजयच्या ओढीने कावराबावरा होऊन त्याला पाहण्यासाठी धडपडू लागला. तिने खोलीत चौफेर नजर घुमावली. परंतु खोलीत संजय नव्हता. ती घाबरली. उरलीसुरली हिम्मत एकवटून ती बाजेवरून उठली अन् तडक उघड्या दाराजवळ गेली. हलकेच डोके बाहेर बघते तर कायनेहमीच्याच मोडक्या लाकडी खुर्चीवर बसलेला संजय आनंदाने गल्लीतील लोकांची रोजची गडबड न्याहाळताना दिसला. क्षणात सर्वस्व गमावलेल्या पार्वतीच्या भावनेचे रुपांतर जग जिंकलेल्या योद्ध्यासारख झाल.

 

बराच वेळ पार्वती आनंदाने बसलेल्या संजय कडे सर्वस्व विसरून बघत होती. दरवाज्याच्या मोडकडीस आलेल्या  चौकटीचा आधाराने डोके टेकवून निरागस संजयच्या चेहऱ्यावरील आनंदाचे हावभाव न्याहाळताना पार्वती तल्लीन झाली होती. जणूकाही जग तिच्यासाठी स्तब्ध झाले होते. काळाने आपली गती मंद केली होती. हळूहळू आजूबाजूचा  परिसर हवेच्या मंद झोताने उडून नाहीसा होत असल्याचे भासत होते. एखाद्या ध्यानमग्न योग्याला केवळ आपले आराध्याच दिसतात तसे पार्वतीला केवळ आणि केवळ संजयच दिसत होता. कितीतरी वेळापासून डोळ्यांच्या पापण्याची उघडझाप करता हे दृश्य पाहणाऱ्या पार्वतीच्या डोळ्यातून तृप्ततेचे झरे गालावरून वाहून कोरड्या जमिनीची तृष्णा भागवत होते. अनंत अंधारातून पार्वतीच्या कर्णपटलावर एक चिरका अन कठोर स्वर आदळला. तशी ती दचकून वर्तमानात परतली. अन गोंधळल्यासारखी इकडेतिकडे बघू लागली. समोरच्याच घराच्या खिडकीतून एक स्त्री तिला प्रश्नार्थक भावनेने विचारत होती,आता बरी आहेस तू ?

 

      मुखातून "होअसा स्वर निघत असतानाच काळाचे चक्र परत उलट दिशेने फिरत असल्याचा भास तिला झाला. आणि मी तर आज संजयला घेऊन दवाखान्याला निघाली होती. मग इथे कशी? समोरची स्त्री काय बोलत आहे याचे जरासेही भान पार्वतीला नव्हते. अचानक तिला सर्व आठवले.  वेगाने घसरत संजयच्या दिशेने येणारी गाडी, गल्लीतील आरडओरडा करणारे लोक, भोवळ येत असलेली ती स्वतः, अन तिला सांभाळणारे ते दोन हात... सर्वकाही एका क्षणात तिच्या समोर जिवंत चित्र बनून उभ राहलं. तसं तीच शरीर सुक्या पानाप्रमाणे थरथरायला लागलं. जवळच बसलेल्या संजयलाही आईला चक्कर येत असल्याचे जाणवले. एव्हाना समोरच्या घरची स्त्री आपल्या बोलण्याला पार्वती काहीच प्रतिसाद का देत नाही म्हणून पार्वती जवळ आली होती. भोवळ येऊन तोल जाणार्या पार्वतीला संजय आणि त्या स्त्रीने आधार दिला. तिला खोलीत नेऊन बाजेवर बसवले. बाजेच्या जवळच असलेल्या स्वच्च माठातले पाणी दिले. माहित नाही केव्हापासून कोरडा पडलेला पार्वतीचा कोरडा घसा शांत झाला. पाणी पिऊन पार्वतीला तरतरी आली. बाजेच्या उश्यासी उभ्या असलेल्या संजयकडे बघून, “अग, जिजा मी इथे कशी? आणि संजयला काही झाले तर नाही ना? संजय सुखरूप तर आहे ना? ", एका क्षणाचा ही विलंब करता एका श्वासांत जिजाला विचारू लागली. "अग,थांब. शांत हो आधी. सर्वकाही ठीक आहे. संजयपण ठीक आहे.", पार्वतीला हाताने सावरत जिजा म्हणाली. जीजाचे हे शब्द एकूण पार्वतीचे भीतीने धडधडणारे हृदय मंद गतीने शांत झाले. कासावीस झालेला जीव शांत झाला.  आतापर्यंत भांबावलेल्या मनस्थितीमध्ये असलेली पार्वती पूर्णपणे वर्तमानात आली. आणि एक दीर्घ श्वास घेऊन जीजाला म्हणाली, “अग, संजयकडे येणारी गाडी बघून मी खूपच घाबरले होते. मी काय कराव,संजयला त्याच्या दिशेने येणाऱ्या गाडीपासून कस दूर कराव काहीच सुचत नव्हत. आणि अचानक मला काय झाले कळलंच नाही. मी चक्कर येऊन पडले. अन कुणीतरी.” पार्वतीच्या बोलण्याचा स्वर अन् गती मंद होत असताना अचानक वीज चमकावी तसा लख्ख प्रकाश तिच्या डोळ्यासमोरून चमकून गेला. “लक्ष्मी", हे नाव पार्वतीच्या मुखातून कणखर आवाजात स्पष्टपणे निघाले. तिच्या डोळ्यातून अनामिक आनंद अन भीतीचे अश्रू तराळले.   

 

पार्वतीची शुद्धी हरवल्यानंतर गल्लीतील रस्त्यावरून ती घरी कशी आली, लक्ष्मीने संजयला गाडीच्या मार्गातून कसे दूर केले, तिला घरी आणून तिची अन् संजयची आई प्रमाणे केलेली सेवा, घराची साफसफाई याबद्दल सर्व हकीकत जिजाने पार्वतीला निवांत सांगितली. जिजाच्या तोंडून लक्ष्मीचे कर्तृत्व ऐकताना पार्वतीचे उर भरून येत होते. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. जणुकाही पार्वती लक्ष्मीचे आभार प्रगट करत होती. काही वेळानंतर जिजा परत घरी निघून गेली.

 

अनामिक आनंदाने पार्वती बाजेवरून उठली. या क्षणी तिच्या मनात संजयची काळजी नव्हती तर लक्ष्मीच्या हाताच्या स्पर्शाची तरल भावना होती. अचानक काळ्याकुट्ट ढगांनी झाकाळलेला सूर्य ढगांना दूर सारून समोर यावा अन् आपल्या प्रकाशाने संपूर्ण सृष्टी उजळून टाकावी त्याचसम पार्वतीचे मन अन् तिचे घर स्वच्छ झाल्याची जाणीव तिला झाली. किती काळापासून अस्ताव्यस्त असलेलं घर आज नीटनीटके दिसत होते. कित्येक दिवसापासून व्यवस्थित झाडू मारल्यामुळे धुळीचे जागोजागी पसरलं साम्राज्य नष्ट झालं होतं. घरात धुळीचा लवलेश नाही हे रॅक वरील भांडे बघून पार्वतीला समजून आले. ती अचंभित होऊन बघत होती. बाजेसमोरच्या भिंतीला लागून असलेल्या छोट्या लाकडी कपाटावर सर्व अंथरुण पांघरूण छान घडी करून ठेवलेल्या दिसल्या. त्या पांघरुणावरून अलगद हात फिरवताना पार्वतीला लक्ष्मीचा उबदार स्पर्श जाणवत होता. त्या स्पर्शात मायेचा ओलावा होता. लक्ष्मीच्या अनंत आठवणी होत्या. नकळत तिच्या लक्षात आले की ही तर तीच गोधडी आहे जी लक्ष्मीने तिला दिली होती. आणि मोठ्या जतनिणे पार्वतीने ती गोधडी आजपर्यंत लक्ष्मीची आठवण म्हणून सांभाळली होती. पार्वतीचे मन अलगद भूतकाळातील स्मृतींच्या हवाली झाले. बालपणीच्या स्मृती जिवंत होऊन पार्वतीच्या डोळ्यांसमोर नाचू लागल्या. पार्वतीच्या घराला लागूनच वाहणाऱ्या  अरुंद उथळ नदीपात्राच्या पलीकडच्या माळरानावर लक्ष्मीचे घर. घराला लागूनच असलेले, वाऱ्यांच्या लहरीसोबत लागणाऱ्या पिकांनी बहरलेली शेते. शेतात रक्ताचे पाणी करणाऱ्या आईवडिलांच्या नजरा चुकवून हातात हात घालून फुलपाखराप्रमाणे हिंदळणाऱ्या लक्ष्मी अन् पार्वती. आनंदाने बालपण घालणाऱ्या लक्ष्मी आणि पार्वतीची ताटातूट लक्ष्मीच्या वडीलांना काही कारणामुळे गाव सोडून जाण्यामुळे झाली. आणि काही दिवसांनीच पार्वतीच्या डोक्यावरचे पित्याचे छत्र हरवले. गोंधडीवरून अलगद हात फिरवणाऱ्या पार्वतीच्या हाताची मूठ घट्ट आवडल्या गेल्याने गोधडीची नीट घडी विस्कटल्यां सारखी झाली. लक्ष्मीच्या दुरावल्यामुळे हरवलेला आनंद आणि वडील गेल्यामुळे हरवलेला आधार पार्वतीला लग्नानंतर पतीच्या रूपात मिळाला. परत पार्वती पतीच्या स्मृतीत हरवली. लग्नानंतर पार्वतीच्या रित्या आयुष्यात आनंदाची उधळण झाली होती. काळ वेगाने हसत खेळत पुढे जात होता. अन् अचानक एके दिवशी अनपेक्षित पणे लक्ष्मी समोर आली. आणदरूपी धान्याचे काठोकाठ भरलेल्या तिच्या जीवनाच्या कोठारात लक्ष्मीच्या येण्याने भर पडलेल्या पार्वतीला आयुष्य स्वर्गासारखे वाटू लागले होते. पण काहीच दिवसानंतर कळवताच गेलेली लक्ष्मी पार्वतीच्या आयुष्यातून पतीचे सुख त्याच्या निधनाच्या रूपात घेऊन गेली. आणि संजयच्या रूपाने पतीच्या निधनाने अंधकारमय झालेल्या जीवनात प्रकाशदीप देऊन गेली. या प्रसंगानंतर लक्षीची आज परत भेट झाली होती. लक्ष्मीच्या आठवणीने बळ मिळणाऱ्या पार्वतीला कधी कधी लक्ष्मीची भीती वाटायची. पार्वतीच्या हातापायातले बळ फुंकर मारल्यानंतर धुळीचे कण जसे नाहीसे होतात तसे नाहीसे झाले. अन् मटकन ती खाली बसली. एव्हाना तिच्या डोळ्यांतून तिच्या नकळत निघणाऱ्या अश्रूंनी फरशीवर विसावली होती. त्या अश्रुंच्या टपोऱ्या मोत्यांकडे पार्वतीची नजर गेली. त्या अश्रूरूपी मोत्यांकडे बघताना पार्वती अंतर्मुख झाली. लक्ष्मी बालपणी आली जीवनात आनंद घेऊन अन् गेली पित्याचा आधार घेऊन. नंतर आयुष्यात आली संजय रुपी आनंद वृक्ष घेऊन अन् गेली पतीचा आधार घेऊन. आणि आता लक्ष्मी परत आली. मनात असंख्य शंकाकुशंकांचे विस्फोट व्हावे आणि त्यात आपली पूर्ण विचारशक्ती नष्ट व्हावी असा आघात पार्वतीला झाला.आता ती काय देणार अन् काय घेऊन जाणार या विचाराने तिची काय मृत्यूची चाहूल लागलेल्या हरणाच्या पाडसासारखी झाली. पार्वतीने भीतीने डोळे घट्ट बंद केले.अंतर्मनामध्ये  लक्ष्मीचा हसरा चेहरा पार्वतीला प्रश्न विचारताना दिसला. "सांग पार्वती तुला काय देऊ अन् काय नेऊ, सांग. सांग पार्वते..". लक्ष्मीचा हसरा चेहरा आता अधिकच मोठा मोठा होताना दिसत होता. आणि त्या मोठ्या होणाऱ्या चेहऱ्यामध्ये  आपले अस्तित्व सामावत असल्याचा भास पार्वतीला होत असल्याचे जाणवत होते...

 

"आई, आई.“ लांबूनच कुणीतरी आपल्याला साद घालत असल्याचा भास पार्वतीला झाला. पार्वती सचेत झाली. "अग आई, कधीपासून तुला आवाज देतोय. खाली काय पाहत आहेस. सायंकाळ झाली आता. आणि तू अजूनही इथेच बसून आहे. खायला काही करायचं आहे की नाही तुला? संजयच्या प्रश्नाने भानावर आलेली पार्वती अधिकच दुःखी झाली. आपल्या मुलाच्या विचारात आपण आपल्या मुलालाच विसरत असल्याची सल पार्वतीच्या मनाला चटका लावून गेली. हातानी ओला चेहरा पुसत ती उठली अन्, “हो रे बाळा, थोडा थांब. तुला काहीतरी खायला बनवते. असे म्हणून ती स्वयंपाक बनवायला लक्ष्मीने स्वच्छ धुऊन ठेवलेले भांडे बघू लागली. इतक्यात जिजा दरवाज्यावर आली. हातात कसलेतरी भांडे प्लेटनी झाकून होते. "अग पार्वती हा घे प्रसाद. सासूबाई मंदिरात गेल्या होत्या. त्यांनी तुझ्यासाठी वरण भाताचा प्रसाद आणला होता. असे म्हणत जिजाने पार्वतीला हातातील भांडे देऊन निघून गेली. पार्वतीलाही स्वयंपाकाला खूप उशीर झाला होता म्हणून त्यांनी त्याच प्रसादावर आपली भूक मिळवली. उद्या दवाखान्यात जायचे आहे या विचारात पार्वती अन् संजय दोघेही बाजेवर झोपेच्या स्वाधीन झाली.

 

आज सकाळी सकाळीच पार्वती संजयला घेऊन दवाखान्यात आली होती. दवाखान्यातील कागदांनी, वेगवेगळ्या रिपोर्ट नी जड झालेल्या पिशवीसारखेच पार्वतीचे डोके भीतीने जड झाले होते. खोलीमध्ये असलेल्या लांब लाकडी बाकावर दोघेही डॉक्टरांची वाट बघत बसले होते. एका कोपऱ्यात असलेल्या भगवान गणेशाच्या मूर्तीकडे पार्वतीचे लक्ष गेले.तिने मनोमन देवाचा आशीर्वाद घेतला.दवाखान्यातील स्पिरिटचा वास वातावरणात भीतीचे सावट पसरवत होता. डॉक्टर साहेबांना यायला बराच उशीर झाल्यामुळे इतर पेशंटची ही बरीच गर्दी वाढलेली होती. आपापसात कुजबुज करणाऱ्या लोकांच्या आवाजातून त्यांच्या आजारांविषयी, आजारांमुळे आलेल्या दुखाविषयी पार्वतीला माहिती होत होती. तशी तिच्या हृदयाची धडधड वाढत जायची. आज डॉक्टर साहेब आपल्या लेकराबद्दल काय सांगणार आहे याचा विचार करून पार्वतीचे डोके सुन्न होत होते. दवाखान्यात उंचावर टांगलेल्या घड्याळाच्या प्रत्येक ठोक्यालगत पार्वतीचा जीव खाली वर होत होता. "डॉक्टर साहेब आले आहे. शांतता बाळगा", सिस्टरच्या आवाजाने पार्वतीचे हृदय छातीचा बरगड्याचा पिंजरा तोडून बाहेर येते की काय असा भाव पार्वतीच्या चेहऱ्यावर उमटला. सकाळी लवकरच आल्यामुळे सुरवातीलाच डॉक्टर साहेबांनी पार्वतीला एकटीलाच आत बोलावले. भीतीमुळे जडवलेली पार्वती भीतभीतच कागदांची पिशवी खांद्याला अडकवून डॉक्टरांच्या केबिन मध्ये गेली.

 

केबिनाचा दरवाजा उघडताच धीर गंभीर चेहरा करून खुर्चीवर बसलेल्या डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचे उसने स्मित पार्वतीला जाणवले. डॉक्टरांच्या सांगण्यानंतर खुर्चीवर बसलेल्या पार्वतीने पिशवीतून जुन्या रिपोर्ट च्या फाईली डॉक्टरकडे दिल्या आणि सर्व प्राण कानात आणून डॉक्टरांचे शब्द ऐकू लागली. "पार्वतीबाई आपण संजयच्या मागील सहा महिन्यापासून इलाज करत आहोत. परंतु म्हणावी तशी काही प्रगती त्यांच्यामध्ये दिसून येत नाही आहे. मागच्या भेटीच्या वेळेस आपण संजयच्या ज्या काही तपासण्या केल्या होत्या त्यावरून मला आता केवळ एकच मार्ग दिसतोय आणि तो म्हणजे पायातील गाठ ऑपरेशन करून काढून टाकणं.” डॉक्टरांचा प्रत्येक शब्द पार्वतीच्या आशेचा खून करत होता. डॉक्टरच्या प्रत्येक शब्दागत पार्वतीचा श्वास छातीतच कोंडल्यासारखा होऊ लागला. मोठ्या हिंमतीने पार्वतीने आपल्या थरथरत्या ओठांतून शब्द काढले, पण साहेब, ऑपरेशन नंतर माझा संजय बाकी मुलांसारखा चालायला, धावायला, खेळायला लागू तर शकेल ना?” “नाही. त्याला काठीच्या आधाराने हळूहळू चालावे लागणार.“ डॉक्टरच्या या निराशाजनक कोरड्या उत्तराने आशेने बघणाऱ्या पार्वतीच्या मनाचा पार चेंदामेंदा करून टाकला. पार्वतीच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. त्या अंधारात केवळ ती दगडांच्या आधाराने उभी असलेली मोडकी लाकडी खुर्ची अन् हातात काठी घेतलेला संजय दिसू लागला.

 

 

भिंतीचा अन् दरवाज्याचा आधार घेऊन पार्वती केबिन बाहेर येत होती.निरागस संजयचा चेहरा पुन्हा पुन्हा तिच्या समोर येत होता.तिला अधिकच गहिवरून येत होते. अश्रूंनी काठोकाठ भरलेल्या डोळ्याच्या कडाचा बांध ढासळू नये म्हणून पार्वती प्रयत्न करीत होती. परत परत आपल्या साडीच्या पदराने डोळे पुसत होती. संजय पासून तिला आपली मनस्थिती लपवायची होती. म्हणून धीर एकवटून ती संजय कडे जायला निघाली. संजय बसलेल्या बाकाजवळ पार्वती खाली मन घालून आपल्या डोळ्यातील अश्रू लपवत आली. मान वरून बघते तर काय? संजय तिथे नव्हता.  संजयला बाकावर नसल्याचे बघून पार्वतीच्या सर्वांग निस्तेज झाले.आणि ती मटकन त्याच बाकावर निर्विकार होऊन बसली.

      

        अचानक कुठुनतरी संजयच्या हसण्याचा आवाज पार्वतीच्या कानावर पडला.तशी ती बाकावरून ताडकन उठून आवाजाच्या दिशेने गेली. समोरचे दृश्य बघून तिचे अंग आनंद आणि भीतीने शहारून गेले. संजय सोबत लक्ष्मी खेळत होती. गेल्या सहा महिन्यापासून संजयला इतके हसताना आनंदित पाहायचे पार्वतीला आठवत नव्हते.सर्व देहभान विसरून पार्वती एकटक त्यांच्याकडे कितीतरी बघतच होती. अचानक येणारी अन् अचानक जाणारी लक्ष्मी. कोण आहे ही माझी मैत्रीण,मला दुःखाच्या सागरात सोडणारी की दुःखाच्या सागरातून बाहेर काढणारी. लक्ष्मीच्या येण्याने मात्र आपल्या मनावर आलेले दुःखाचे ढग क्षणात नाहीसे झाले याचे नवल तिला वाटू लागले. काही क्षणा आधी दुःखाने जड झालेले अंतःकरण क्षणात पिसासारखे हलके वाटू लागले होते. स्वर्गानुभूती देणारे ते दृश्य पार्वती देहभान डोळ्यात सामावू लागली.

 

अगं पार्वती,कुठ हरवलीस", असे म्हणत लक्ष्मीने पार्वतीच्या हाताला स्पर्श करून वास्तवात आणले. लक्ष्मीच्या स्पर्शाने पार्वतीच्या मनावरील निराशेतून जन्मलेल्या अगतिकतेचे मळभ पूर्णपणे नाहीसे झाले.एक नवी उमेद मनात अंकुरित होत असल्याचा भास तिला जाणवू लागला. "अग पार्वती,किती वेळ अशीच शांत राहशील", लक्ष्मीच्या बोलण्याने पार्वती भानावर आली. "तुला इतक्या दिवसांनी बघून मन भरून आले .", लक्ष्मीचा हात हातात घेत पार्वती म्हणाली. "काल घरी आलीस आणि मला भेटताच निघून गेलीस. माझ्याशी बोलायचं नव्हतं का तुला?", चेहऱ्यावर हलकाच रुसवा आणत पार्वती म्हणाली. "नाही पार्वते,मी तुलाच भेटायला येत होती. परंतु तिथे आल्यानंतर तो गोंधळ झाला अन् तू चक्कर येऊन पडली. तुला नि संजयला सांभाळून तुझ्या घरी नेले. घराचा अवतार बघून मला रहावले नाही म्हणून तुझ्या घराची साफसफाई करण्यात गुंग झाले. तसेही तुझ्या चेहऱ्यावर खूप थकवा जाणवत होता. म्हणून तुलापण उठवून त्रास द्यावासा वाटला नाही. संजयला गल्लीतून आणतानाच मला त्याच्या पायाच्या गाठीबद्दल समजले. तू झोपून असतानाच त्याच्या पायाची गाठ मी बघितली. आणि तसाही मला परत जायला उशीर होत होता अन् गप्पागोष्टी करण्याची ती वेळ मला योग्य वाटत नव्हती. तुझ्याकडे काल असलेल्या पिशवीकडे बघून मला समजले होते की तुम्ही दवाखान्यात जायला निघाले होते. म्हणून उद्या सकाळी लवकर येऊन तुला भेटावे असा विचार करून मी निघून गेले.” लक्ष्मी समजावण्याचा स्वरात पार्वतीला म्हणाली. ”आणि आज सकाळी तुझ्या घरी गेल्यावर समजलं की तुम्ही दवाखान्यात आले आहात. मग कशाचाही विचार करता दवाखान्याची चौकशी करून इथे आले. परत लक्ष्मी म्हणाली. लक्ष्मीच्या बोलण्यातील आत्मियता बघून पार्वती सुखावली. “अगं चल खूप उशीर होतोय मला. मला निघायला हवं. पार्वतीच्या हातातून हात सोडवत लक्ष्मी म्हणाली. ”अगं पण कुठ चालली हे तर सांग?", पार्वतीच्या प्रश्नाला नेहमी प्रमाणे चेहऱ्यावर हलकेच स्मित करून लक्ष्मीने टाळले अन् पार्वतीकडे पाठमोरी करून चालायला लागली.

लक्ष्मीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघताना तल्लीन झालेल्या पार्वतीच्या मनात अचानक वीज चमकावी तसा एक विचार आला. लक्ष्मी तू कशासाठी आली होती? आता तू माझ्यापासून काय हिरवणार आहेस?",असा प्रश्न पार्वतीच्या डोळ्यांनीच पाठमोऱ्या जाणाऱ्या लक्ष्मीला केला.

हळूहळू जाणारी लक्ष्मी अचानक थांबली. हळूच मागे मान वळवून पार्वतीकडे ओझरती नजर टाकली मोठ्याने हसत म्हणाली,घाबरू नकोस, मी तुझे दुःख न्यायला आली होती."

 

पार्वतीचे मन शहारून आले. लक्ष्मीचे हे मोठ मोठ्याने हसणे तिला ओळखीचे वाटले..




कथा कशी वाटली याबद्दल आपले अभिप्राय जरूर कळवा.

संजय आजारातून बरा झाला असेल का?

तुम्हाला लक्ष्मीचे पात्र कसे वाटले?

लक्ष्मी परत पार्वतीला भेटेल काय?



लेखक :- मोहन मारोती चालूरकर  (9657244895)

               वरोरा 







वैशिष्ट्यीकृत पोस्ट

दिशाहीन मानवी समाज...

            दिशाहीन मानवी समाज मानवी समाज व्यवस्था  मानवी समाजाचा विचार करायचा झाला तर मानवाच्या उत्क्रांती पासून विचार करायला हवा . मानवाची...