बुधवार, १५ मार्च, २०२३

पाझर

                        पाझर...

                      सूर्य आपली सर्व शक्ती पणाला लावून पृथ्वी तलावर आग ओकत होता. पृथ्वी मातेकडून त्याचा जिव्हारी लागेल असा अपमान झाला होता की काय हे कळायला मार्ग नव्हता. आज आपल्या क्रोधाग्निने पृथ्वी तलावरील सर्व जीव सृष्ट्रीचा नायनाट करून आपल्या अपमानाची परतफेड जणू तो लाल तप्त तारा करू पाहत होता....

                       आज वारा सुध्दा सूर्य देवाच्या मदतीला धाऊन आला होता. सूर्या कडून उष्ण शक्तीचे वरदान मिळवून सर्व पशू पक्षी, वृक्ष वल्ली तील जलांशाचे वाफेत रूपांतर करून तो आपले काम ईमानदार चाकराप्रमाने इमाने इतबारे करत होता.... 

                      या अभद्र युतीमुळे सर्वत्र त्रहीमाम माजला होता.. झाडांची लेकरे रुपी पर्णे कोमेजून सुकली होती. त्यामुळे काही दिवसापूर्वी तकटकीत हिरवीगार दिसणारी झाडे आता विकृत ,कुरूप ,  हाडकुडे भासत होती. आणि मोठ्या आशेने विविध आकाराचे नि रंगाचे किडे, उद्योगी मुंग्या , आपल्या जिभेने त्यांची शिकार करून त्यावर पोट भरणारे सरडे, या झाडावरून त्या झाडावर तुरुतुरु धावणारे मध्येच स्तब्ध होणाऱ्या खारी यासारखे छोटे जीव,  धापा टाकणारी कुत्री,खायला काहीही न मिळाल्यामुळे झाडाची खोडे चाटनारी गुरे यासारखे इतरही जीव  झाडाच्या सावलीत आपली दिनचर्या पूर्ण करू पाहत होती.  निर्जनस्थळी भग्न अवस्थेत असलेल्या मंदिराच्या चिरचींध्या झालेली पताका जशी हवेत फडफडून आपले अस्तित्व टिकविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असते त्याच सारखी अवस्था झाडांच्या फांद्यांच्या अग्रावर असणाऱ्या चार दोन पानांची होती. एखाद्यावेळी  वाऱ्याची जोरदार चपराक आपल्या उरल्या सुराल्या पानांवर पडून आपल्या पासून या पानांना दूर करणार .या विचारांनीच झाडे काळवंडलेली भासत होती. आतापर्यंत टिकाव धरून असलेल्या झडांचीही पाने आपले भान हरपून झाडापासून विलग होऊ लागली होती. आणि वारा त्यांना आपल्या सोबत कुठच्या कुठं घेऊन जात होता. ...

                           जमीनही तापून तापून सूर्या सारखीच उष्णता परावर्तित करू लागली होती. आसपासचा परिसर झलारत होता..

अशा या निष्ठुर वातावरणाला राघोबा चे हिरवीगार जवारीचे पीक सूर्यदेवाला डोळे दाखवत ताट मानेने उभे होते. नेहमी प्रमाणे राघोबा आपल्या शेताकडे आपल्या मुलाला भेटायला..त्याच्याशी हितगुज करायला निघाला होता...

                        चालता चालता तळपायातून वेदनामय कळ उत्पन्न होऊन सर्वांगात पसरून विरून गेली तसा राघोबा भोवळ येऊन हातातील काडीचा आधार घेऊन बाजूलाच असलेल्या निष्पर्ण झाडाच्या वांझोट्या सावलीत विसावला... हातातील काठी बाजूलाच ठेऊन मांड्यांपासून उघड्या असलेल्या पायवाटेच्या धुळीने माखलेल्या आपल्या पायाकडे पाहत होता... आजुबाजुला असलेल्या डोंगरावरून घसरलेल्या भल्या मोठ्या दगडाची बारीक तीक्ष्ण चिरा त्याच्या तळ पायात खोलवर रुतली होती. जखमेतून निघालेले रक्त पायाला असलेल्या धुळीने घट्ट होऊन सुकले होते. त्या जखमेकडे बघून असहायत्तेची एक विलक्षण हास्य लकेर त्याच्या चेहऱ्यावर उठली होती....खूप वेळ तो पायाकडे आणि जखमेला निर्विकार मुद्रेने बघत होता.. भोवळ आल्यामुळे पायातून रुतलेली चिरा काढून टाकावी याचेही भान आणि त्रान त्याच्यात नव्हते. तो अजूनही तिथेच बसून होता.. 

                         सत्तरी ओलांडलेला राघोबा संसाराच्या ओझ्यामुळे कमरेतून वाकला होता. निसर्गाने आणि दैवाने त्याची साथ कधीच दिली नाही. परंतु निसर्गाशी आणि दैवाशी तो आजपर्यंत मोठ्या हिंमतीने लढत होता.

                     निसर्गाची अवकृपा असलेल्या डोंगराळ प्रदेशात त्याचा जन्म ..पावसाचे अत्यल्प प्रमाण ना माणसांची तहान भागवायला पुरेशे होते ना पिकांचे..तरीही येतील कुणबी दगडातून आपली भाकर मिळावीत होता.. याच कठीण परिस्थितीत लहानाचा मोठा झालेला राघोबा ... डोंगरा सारखाच कणखर होता..आपली अख्खी हयात त्याने या डोंगराळ भागातील लाल दगड-मातीच्या शेताला पावसाचे पाणी पाजून धान्य पिकविण्यात घालविली होती..

                     शेतातून मिळणाऱ्या अल्पश्या उत्पन्नात तो आपल्या कुटुंबाचे पोट भरायचा. सदैव दुष्काळ असणाऱ्या या प्रदेशातील ओसाड  जमिनी सारख्या त्याच्या कोरड्या जीवनात प्रेमाचा , मायेचा ओलावा देणारी दोनच माणसे त्याच्या आयुष्यात होती. पार्वती- त्याची बायको आणि सदा - त्याचा मुलगा... 

                      या दोघांनीही खांद्याला खांदा लावून राघोबाची साथ दिली होती.दरवर्षी पडणाऱ्या दुष्काळाचा आणि जीवनात येणाऱ्या संकटांचा सामना राघोबाने मोठ्या हिमतीने नि आनंदाने केला तो पार्वती आणि सदाच्याच साथीने.... 

                      गरिबीच लेण घेऊन जन्मलेला राघोबा कधी कधी मोठ्या खिन्नतेने आपल्या बायकोला म्हणायचा," पार्वते ,तुला आज पस्तोर या गड्याने दोन लुगड्या खेरीज काय बी दिलं नाहीस तरिबी तू कधी राग राग केली नाहीस . दोन येडच्या खाण्याची उपरती असलेला मी.. आनं अश्या गड्यासोबत तू लगीन केलंस ...सुखी संसाराच्या गोड स्वप्नांना दिन रात्रीच्या कष्टांनी फुलुच दिली नाही..

पण कष्टानाही दैवाचा प्रसाद मानून हसत हसत सामोरे जात राहिली..."

                     पार्वती आणि राघोबाच्या जीवनात सदा - त्यांचा मुलगा तोच आनंदाचा जिवंत झरा  होता. सदा ही खूप समजदार होता. त्याला आपल्या परिस्थितीची पूर्ण जाणीव होती. बापाला प्रत्येक कामात मदत करणे त्याचा धर्म होता. मोठ्या हिमतीने त्याने कुटुंबाची धुरा सांभाळली होती. कष्टाचा वारसा लाभलेल्या सदाला शेतीसाठी पाण्याची गरज समजली होती. शेतातील काम करताना तो नेहमीच राघोबाला याविषयी बोलून दाखवत असे. खूप विचाराअंती सदा शेतालाच लागून वाहणाऱ्या नाल्याच्या बाजूलाच एक विहीर खणायाच्या बेतापर्यंत आला होता. राघोबाला हा विचार बोलूनही दाखवला होता...

                      आपले जीवन ,त्यातील कष्ट ही दैवाची मर्जी असे मानणार राघोबा दैवाशी नेहमीच दोन हात करत होता तरीही त्याला विहिरीचा विचार पटत नव्हता. पिकांसाठी पाण्याची गरज तो समजत होता पण या खळकाड डोंगराला पाझार कधीच फुटणार नाही हे सत्यही तो जाणून होता..परंतु मुलाच्या इच्छेखातर त्याने विहीर खणायला सहमती दर्शविली होती..

                       राघोबाच गाव चहूबाजूंनी डोंगरांनी सुरक्षित केलल होत. मायेच्या ममतेने कडेवर घेतलेल्या छोट्या बाळासारखं राघोबाच गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेले ..गावाच्या शेजारून अवखळ अल्लड  खळखळपणे वाहणारा नाला. .. आणि त्याचा सानिध्यात लहरणारी शेते.संपूर्ण गाव हिरव्या रंगानं रंगून जायचं. गावाला निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य फक्त पावसाळ्यातच लाभायच. पावसाळा संपायला येता येता या सोंदर्याचे रंग उडायला लागायचे .. हिरवेपणा वाळलेल्या पानात नाहीसा व्हायचा.. वाहणाऱ्या नाल्यातील पाण्याची जागा  असंख्य लहान मोठे गोलसर पांढुरके दगड घ्यायची ..आणि हळुहळू निसर्गाच्या सौंदर्यानी नटलेल गाव एका ओसाळ माळरानात बदलून जायचं... हाती आलेल्या पिकांसोबत शेतकऱ्यांच्या आशा डोळ्यासमोर मरून जायच्या..

                    पावसाळ्या नंतर येणारा हिवाळा उन्हाळा सारखा तपायचा. आणि उन्हाळ्यात तर सूर्य आग ओकून अख्ख माळरान जाळून टाकायचा... गेल्या कित्येक वर्षांपासून हेच गावाचं नशिबी झालं होतं.

                   आणि अशा दुष्काळी वातावरणात सदा कुदळ, पार , फावडा घेऊन राघोबा सोबत निश्चित केलेल्या जागेवर आला. धोतर आणि फक्त डोक्यावर फटका बांधलेला सदा आत्मविश्वासाने ओतप्रोत वाघासारखा दिसत होता. धरणी मातेला कपाळ लावून त्याने धरणी मातेला पाण्याचा आशीर्वाद डोळे मिटून हात जोळून मनोमन मागितला. आशीर्वादाचा रुपात त्याला पाण्याने भरलेली विहीर आणि तिच्या पाण्यावर तृप्त झालेली हिरवीगार पिके वाऱ्याच्या झोतासंगे गाणी गात असताना दिसली. आणि दिसली आई वडिलांची समाधानाने सुखावलेली मूर्ती. सदाचे डोळे या दृष्यानी पाणीदार चमकले. आणि स्फूर्ती ने त्याची छाती अधिक रुंद झाली. सदाच्या या रूपाकडे पाहून राघोबा च्या मनात आशा पल्लवित झाल्या होत्या. हा गडी काही ना काही करणार असा विश्वास त्याच्या मनात अंकुरत होता.

                     सर्व शक्ती हातात एकवटून सदाने कुदळ डोक्याच्या वर उंचावर नेऊन सर्व शक्तिनिशी जमिनीत खुपसली.. तसा निरभ्र आकाशात वीज कडाळावी तश्या आवाजाने कुदळ आत असलेल्या मोठ्या दगडाला लागून बाहेर उसळली.. आणि दगडाची एक टोकदार शिळा बाजूलाच उभ्या असलेल्या राघोबा च्या पायात वायुवेगाने घुसली.. क्षणात रक्ताचा झरा त्याच्या पायातून धरणीमातेत सामावला..

                   दिवसामागून दिवस जात होती..सदाचा पराक्रम सृष्टीचा प्रत्येक कण अनुभवत होता. त्याच्या कार्याच्या यशस्वीते बद्दल शंका कुशंका ,तर्क वितर्क,अंदाज इत्यादींनी संपूर्ण पंचक्रोशी व्यापली होती.. तस तसा राघोबा च्या जीवाची घालमेल वाढत होती.  तहान भूक विसरून रात्रीचा दिवस करून सदा राघोबा सोबत विहिरीचे काम करत होता. पण विहिरीच्या तळातून पाझर काय साधा पाण्याचा गंधही येत नव्हता..

                 मोठ्या आशेने अन् आत्मविश्वासाने सुरू केलेले काम सदाच्या सहनशीलतेचा अन् ताकदीचा अंत बघत होते. पण सदाही पाणी या एकाच ध्येयाने पुरता वेडा झाला होता... हार पत्करायाला  तयार नव्हता..

                 पार्वती अन् राघोबा दोघेही सदा बद्दल चिंतातुर झाली होती. सदाच्या ढासळत्या तब्बेतीची काळजी दोघांनीही झोपू देत नव्हती . बापाच्या कष्टाला भरघोस पिकाच फळ मिळाव यासाठी पाणी ही एकच कमतरता होती अन् ती दूर करणे .यासाठी जिवाचं मोलही चुकायला तो तयार होता. याची कल्पना दोघांनीही आली होती .म्हणून एके दिवशी सकाळी दोघांनीही सदाला विहिरीचे काम थांबण्याचा सल्ला दिला.. पण ध्येयवेडा झालेला सदा म्हणाला, " आई बाबा तुमची कष्ट मी लहान असता पासून बघत आहो. या कष्टाचं फळ मिळायला हवं तसं कधीच मिळालं नाही..नेहमीच अर्ध्या भाकरीवर आपण समाधान मानलं.. पण आता तसं होणार नाही. मी तुमच्या कष्टाला पाण्याची साथ मिळवून देऊन माझा संकल्प पूर्ण करणार."

                एव्हाना विहीर खूप खोल झाली होती. पण साधा पाझर ही फुटला नव्हता. नाल्याच्या खाली पाणी नक्कीच लपून असेल आणि तिथे विहीर खणली तर खात्रीशीर पाणी मिळेल .या विश्वासाने सदाने विहिरीचे काम सुरू केले होते.. आणि तो आताही या विश्वासावर ठाम होता. 

                 दिवेलागणीला विहिरीचे काम आटोपून सदा घरी आला. घरासमोर असलेल्या लिंबाच्या बुडाशी त्याने कुदळ पार हे ठेवले. आणि अंगावर पाणी घेऊन तो बाजेवर पडला होता. आई भाकरी करत करत त्याच्या सोबत सहज बोलत असताना राघोबा बाहेरून आला. पार्वतीने आपला स्वयंपाक आटोपून दोघांनीही ताट वाढली. आणि स्वतःही शेत शिवाराच्या गोष्टी करत जेवण करून भांडीकुंडी करत बसली. सदा आणि राघोबा बाजेवर पडून विहिरी बाबत चर्चा करू लागले. "सदा, आर लेकरा विहिरी साठी खूप जीव तोडलास तू.. पण राजा धरणी माय काही तुला पाणी देईल असं नाही..जाऊ दे आपलं दैवच मुंगीसारख... जास्त मनावर नको घेऊस... उद्या पासून राहू दे... धरणी मायला एक दिस फुटल पाझर... मिळल पाणी..", निराशेच्या अन् समजुतीच्या ओल्या आवाजात राघोबा म्हणत म्हणत गाढ झोपी गेला.."

                       बापाचे समजुतीचे शब्द एकाताना सदा शांतपणे बाजेवर पडला होता पण ती शांतता वरवरची होती. आतमधून मात्र त्याला खूप गहिवरून येत होते. त्याचा पूर्ण भूतकाळ खडकातून पाझरणाऱ्या पाण्यासारखे त्याच्या मनातून पाझरू लागला. त्यात बापाचे  हळुवार निशब्द प्रेम , बापाचे अविरत कष्ट, बापाची अर्ध्या भाकरीवर भागलेली भूक त्यामुळे कीड लागल्यामुळे वाळत चाललेल्या झाडाच्या खोडासरखी काया , उमेदीचा - आशेचा एकही किरण नसलेले निस्तेज डोळे, आयुष्यभर नाईलाजाने फक्त धोतर घातलेला अर्धनग्न बाप अश्या अनेक आठवणी त्याच्या मनात झिरपू लागला. पाझरणाऱ्या आठवणीच्या पाण्यात आपण गटांगळ्या खाऊन बुडू लागलो असा भास त्याला होऊ लागला...

             विचारमग्न सदाला झोप येत नव्हती. पूर्वेला आकाशात लालिमा पसरायला सुरुवात झाली होती. अंधारलेल्या परिसरातून विविध प्रकारच्या आकृत्या हळुवार साकार होत होत्या. शीतल हवेची चादर पांघरून गाव साखर झोपेत असताना सदा मात्र विचारांच्या, स्वतःच्या अपयशाने त्यामुळे आलेल्या क्रोधाने पेटून उठला अन् हातात कुदळ पार घेऊन विहिरीच्या ठिकाणी पोहोचला.

             उगवतीला लाल रंगाची उधळण करत सूर्य संथपणे वर येत होता . एक नजर सदाने आता पर्यंत केलेल्या पराक्रमावर फिरविली.  विहिरीच्या सभोवताली मातीचा नि दगडांचा मोठा ढीग विहिरच्या खोलीची आणि सदाच्या मेहनतीची साक्ष द्यायला उभे होते. दहा बारा हात रुंदीची विहीर निमुळत्या आकारात चार पाच माणसे खोल होती. विहिरीच्या भिंतीवर कुदळीचे घाव दिसत होते. जागोजागी झाडाच्या मुळ्या विहिरीच्या भिंतीतून असहाय लटकलेल्या दिसत होत्या. सदाने कुदळ पार विहिरीत टाकले आणि झाडाच्या मुळांच्या आधाराने तो खाली उतरला. आतमध्ये ओल्या मातीचा गंध पसरला होता. सदाच्या क्रोधाला ओल्या मातीच्या गंधाने आणखीनच भडकाविले होते. क्रोधाग्निने पेटलेला सदाने आता पाण्याचा आणि आपल्या विश्वासाचा सोक्षमोक्ष लावायच्या इराद्याने कुदळ दोन्ही हातानी घट्ट आवळली आणि सर्व शक्तिनिशी आपला राग कुदळीच्या रुपात धरणी मातेच्या पोटावर काढू लागला. तप्त शरीर, सूर्याचे प्रतिबिंब अंकित झालेले लाल डोळे, रागाच्या आवेशाने स्फुरणाऱ्या नाकपुड्या, लयबध्द तेणे खाली वर होणारी छाती,  शिरा- नसांचे बंधन तोडून शरीराच्या बाहेर येऊ पाहणारे सळसळणारे रक्त असा पाण्याच्या ओढीने पेटलेला सदा एका पाठोपाठ कुदळ पारीचे घाव कितीतरी वेळ मारत होता नि मातीचा ढिगारा आकाशाच्या दिशेने वाढत जात होता. 

                सदाच्या घामाने भिजलेला मातीच्या गंधाने वातावरण भाराले होते... पाण्याच्या खुणा जाणवत होत्या...सदाची अवस्था पाहून धरणी मातेला पाझर फुटत होता... एक भली मोठी शीळा पाण्याचा प्रवाह रोखून असल्याचा भास सदाला झाला . त्या शिळेला बाजूला सारल्यास पाणी मिळेल या विचाराने त्याचे शरीर शहारले. 

               सदाच्या श्वासाची गती मंद होत होती... घसा कोरडा पडला होता... विहीर आपल्या सभोवती फिरत असल्याचा भास होत होता.. डोळ्यात बापाची प्रतिमा अश्रूने पुसट होत होती.. पाण्याच्या ओढीने मन वाहत होते.. पारीचे कुदळीचे प्रहार एका पाठोपाठ एक दगडाला फोडत होते... घावगनिक पाण्याचा पाझर वाढत होता..  सदाचे मन आणखीनच अधिर झाले... आणि शरीरात होते नव्हते सर्व बळ एकवटून त्याने एक कुदळीचा अंतिम प्रहार त्या पाणी रोखून धरणाऱ्या शिळेवर केला... पाण्याच्या दाबाने आणि सदाच्या प्रहाराने शिळेचे असंख्य तुकडे बंदुकीच्या गोळीप्रमाने इतरत्र विखुरल्या...आणि जागृत ज्वालामुखी प्रमाणे मुक्त झालेल्या पाण्याच्या प्रवाहाने सदा आनंदित होऊन खाली कोसळला... विखुरलेल्या दगडाची एक तीक्ष्ण शिळा त्याच्या छातीत घुसली होती... राघोबा चा आनंदित स्पष्ट चेहरा त्याच्या डोळ्यासमोर  आला... स्वच्छ नितळ पाण्याच्या पाझारात सदाच्या रक्ताचा पाझर एकरूप झाला.... सदाचा पराक्रम .... स्वप्न .....पूर्ण झाले..... हळुवारपणे सदाचे डोळे बापाचा आनंदित चेहरा मनात साठवून कायमचे बंद झाले.... कायमचे.....

                         सुखलेल्या डोळ्यातून मोठ्या कष्टाने पाण्याचा थेंब राघोबा च्या धुळीने माखलेल्या पायावर पडला. उष्ण वाऱ्याच्या झोताने त्याच्या डोक्यावरचा फाटका गमचा खाली पडला तसा राघोबा भानावर आला. पायात खोलवर रुतलेली बारीक शिळा काढताना सर्वागात जाणवलेली वेदनेची कळ सदाला भेटण्याच्या ओढीने विरून गेली. शरीरातली उरली सुरली ताकद गोळा करून बाजूलाच पडलेल्या काठीचा थरथरणाऱ्या हातांनी आधार घेऊन उभा होऊन शेताकडे चालू लागला. जवळच असलेल्या शेतापर्यंत मुंगीच्या पावलांनी चालणाऱ्या राघोबाला बराच वेळ लागला. आणि जगासाठी भूतकाळ झालेला सदा राघोबाला सूर्याच्या प्रखर उष्णतेने पेटलेल्या माळरानात  हवेच्या स्पर्शाने लहरणाऱ्या हिरव्यागार ज्वारीच्या रूपाने पिकात दिसला. तप्त उन्हात सावलीच्या रूपाने डोक्यावरून मायेचा हात फिरवणाऱ्या लिंबाच्या झाडात सदा दिसला.. शेतातल्या प्रत्येक कणाकणातून सदचा स्पर्श  जाणवला.. 

                  शेतात फिरता फिरता राघोबा विहिरीकडे आला. तो विहिरीच्या जवळच असलेल्या दगडावर काठीचा आधार घेऊन विहिरीकडे एकटक बघत बसला . पंधरा वीस वर्षापूर्वी विहिरीच्या सभोवती असणारी मातीची उंच ढिगारे नष्ट झाली होती पण सदाच्या घामाचा अन् रक्ताचा पाझर आजही पाण्याच्या रुपात विहिरीत पाझरत होता.....

मोहन मारोती चालुरकर 

गडचांदुर ,ता. कोरपना , जि. चंद्रपूर

9657244895

पाझर..


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Visit again. Follow this blog.

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

दिशाहीन मानवी समाज...

            दिशाहीन मानवी समाज मानवी समाज व्यवस्था  मानवी समाजाचा विचार करायचा झाला तर मानवाच्या उत्क्रांती पासून विचार करायला हवा . मानवाची...